नॅरोगेज मार्ग झाला खड्डेमुक्त

खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवल्याने प्रवास सुखकर

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ-माथेरान या घाटातून नेरळ येथून माथेरान जाणारी मिनीट्रेन तब्बल चार वेळा डांबरी रस्ता ओलांडून जात असते. माथेरान डोंगरात प्रचंड पाऊस होत असतो आणि पावसाच्या पाण्यामुळे डांबरी रस्ता खराब होतो. परिणामी, या घाटरस्त्यातील नॅरोगेज मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी खड्डे पडून अपघाताची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, त्या चारही रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावून रस्ता वाहनचालकांसाठी सुखकर बनविण्यात आला आहे.

माथेरानमधील प्रचंड पावसामुळे घाटरस्त्यातून पाणी वाहत जाऊन डांबरी रास्ता खराब होत असतो. त्यामुळे मिनीट्रेनच्या नॅरोगेज मार्गावर प्रचंड खड्डे तयार होतात आणि त्यामुळे वाहनचालकांची वाहने अडखळत त्या रस्त्याने जात असतात. नॅरोगेज मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांना सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेच्या मागणीनंतर कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने 12 तास घाटरस्ता बंद ठेवून वॉटर पाईप स्थानक या भागात रस्त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती डागडुगी ही केवळ चार दिवसांपुरती राहिली होती. नॅरोगेज मार्गावर वाहनचालकांची होणारी त्रेधातिरपीट लक्षात घेऊन रेल्वेकडून नेरळ- माथेरान घाट रस्त्यावर ज्या चार ठिकाणी नॅरोगेज मार्गांची क्रॉसिंग आहे तेथे पेव्हर ब्लॉक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. नेरळ येथून माथेरानकडे जाताना घाट रस्त्यात जुम्मापट्टी चढाव तसेच वॉटर पाईप स्टेशनच्या अलीकडे आणि पलीकडे तसेच पेब किल्ला रस्ता सुरु होतो, अशा ठिकाणी रेल्वे प्रशासनाने सिमेंट बांधकाम करून पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम पूर्ण केले आहे. त्याचा परिणाम वाहनचालकांना चांगला आणि सुखकर प्रवास करता येऊ लागला आहे.

Exit mobile version