। रायगड । प्रतिनिधी ।
बारावीला समकक्ष असलेल्या दोन वर्षांच्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाचे यंदाचे हे अखेरचे वर्ष ठरणार आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून या द्विलक्षी अभ्यासक्रमाऐवजी कौशल्य शिक्षणावर आधारित असलेला नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांची यंदाच्या शैक्षणिक वर्षांत पुढील नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात सध्या सुरू असलेले द्विलक्षी अभ्यासक्रम बंद करून एनएसक्यूएफ हा नवीन व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे.
डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार अधिकाधिक युवकांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने, रोजगार, स्वयंरोजगार करण्यास प्रवृत्त करून महाविद्यालयीन शिक्षणाकडे जाणारा लोंढा थांबवावा, या उद्देशाने 1978-79 पासून व्यवसाय विषयांची 30 टक्के व्याप्ती असलेले 2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केले होते. हा अभ्यासक्रम बारावी समकक्ष म्हणून ओळखला जात असल्याने अजूनही शेकडो विद्यार्थी इकडे प्रवेश घेतात.
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत अनेक तांत्रिक स्तरावरील अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यासोबतच कृषी, मत्स्य या गटातील एकूण 16 व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येतात. अशा स्थितीत राज्यात सुरू असलेल्या द्विलक्षी अभ्यासक्रमातील बदल झालेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत असे तांत्रिक शिक्षण मिळावे, यासाठी तांत्रिक गट, वाणिज्य गट व कृषी गटातील एकूण 13 व्यवसाय अभ्यासक्रम नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेम वर्कशी सुसंगत केले आहेत. यामुळे मत्स्यगटातील फिश प्रासेसिंग टेक्नॉलॉजी व फ्रेश वॉटर फिश कल्चर तसेच तांत्रिक गटातील केमिकल प्लॅट ऑपरेटर हे अभ्यासक्रमही बंद केल्याने त्याच पार्श्वभूमीवर द्विलक्षी अभ्यासक्रम बंद केला जाणार आहे.