वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ माकप नेते सिताराम येच्युरी यांचे निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिनाभरापासून सिताराम येच्युरी यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात होते.
सिताराम येच्युरी यांच्या जाण्याने कम्युनिष्ट पक्षाने बुद्धीवादी चेहरा गमावला आहे. सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 ला मद्रास (चेन्नईत) एका तेलुगू भाषिक ब्राह्मण परिवारात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर त्यांच्या आई कल्पकम येचुरी एक सरकारी अधिकारी होत्या.
सीताराम येचुरी यांनी नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तसेच त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या उच्च माध्यमिक परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच बीएचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर दिल्लीतील जेएनयू येथे एम.ए. अर्थशास्त्रचं शिक्षण घेतलं होतं. आणीबाणीच्या काळात जेएनयूमधील अटक होणार्या विद्यार्थ्यांमध्ये येचुरी हे देखील होते. सीताराम येचुरी हे जेएनयूमध्ये शिक्षण घेत असताना राजकारणात सक्रिय झाले होते. ते जेएनयू विद्यार्थी संघाचे तीनवेळा अध्यक्ष बनले होते. येचुरी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रक वाचून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांचं ते आंदोलन चांगलंच गाजलं होतं. सीताराम येचुरी हे माजी सरचिटणीस हरकिशन सिंग सुरजीत यांचा आघाडी उभारणीचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी 1996 मध्ये काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत संयुक्त आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. त्यांनी 2004 मध्ये यूपीए सरकारच्या स्थापनेदरम्यान आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयुष्यभर त्यांनी कम्युनिष्ट पक्षाचं काम जोमाने केलं. विशेष म्हणजे भारतात कम्युनिष्ट पक्षाच्या वाढीचा आणि पक्षाला उतरती कळा लागण्याचा काळही येच्युरी यांनी पाहिलेला आहे. सध्याच्या काळाच्या त्यांनी केरळमधील सरकारमध्येही महत्वाची भूमिका बजावली होती.