| बंगळुरु | वृत्तसंस्था |
चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करुन इस्त्रोने एक नवा भारत घडविला आहे. या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली असून यापुढे 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी जाहीर केले.
मोदी शनिवारी ग्रीसहून थेट बेंगळुरूला पोहोचले. येथे ते इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले आणि इस्रो प्रमुख एस सोमनाथ आणि इतर शास्त्रज्ञांची भेट घेतली आणि चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
शास्त्रज्ञांना संबोधित करताना ते भावूक झाले. थोडावेळ मौन बाळगले आणि भावनांना आवर घातला. ते म्हणाले की, तुमच्या मेहनतीला, तुमच्या संयमाला सलाम करतो. पीएम मोदी म्हणाले की, आजचा भारत हा लढाऊ भारत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, काही वर्षांत भारताचा अंतराळ उद्योग 8 अब्ज डॉलर वरून 16 अब्ज डॉलर होईल. भारतात नवीन शक्यतांची दारे उघडत आहेत. अंतराळ क्षेत्रातही सरकार सातत्याने सुधारणा करत आहे.
गेल्या 4 वर्षात अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपची संख्या 4 वरून 150 वर पोहोचली आहे. चंद्रयानासंदर्भात प्रश्नमंजुषा स्पर्धा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मी तरुणांना यात सहभागी होण्याचे आवाहन करतो असे त्यांनी जाहीर केले. ज्या ठिकाणी चांद्रयान 3 सुखरुप उतरले त्या जागेला आता शिवशक्ती तर चांद्रयान 2 ज्या जागेवर उतरणार होते त्या जागेला आता तिरंगा असे संबोधले जाईल, असेही मोदींनी जाहीर केले.