आयडीएफसी फर्स्ट बँक नवा टायटल स्पॉन्सर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बीसीसीआयला मायदेशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने सोनी स्पोर्ट्सला मागे टाकत बीसीसआयची टायटल स्पॉन्सरची डील जिंकली. आता आयपीएफसी बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी 4.2 कोटी रूपये देणार आहे.
बीसीसीआयने टायटल स्पॉन्सर लिलावासाठी आपली बेस प्राईस 2.4 कोटी रूपयापर्यंत कमी केली होती. या लिलावात फक्त दोन कंपन्याच सहभागी झाल्या होत्या. मास्टरकार्डने पेटीयमकडून टायटल स्पॉन्सर टेकओव्हर केले त्यावेळी ते बीसीसीआयला प्रती सामना 3.8 कोटी देत होते. बीसीसीआयच्या टायटल स्पॉन्सरची लिलाव प्रक्रिया शनिवारी मुंबईत पार पडली. ज्यावेळी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळी आयडीएफसी फर्स्ट बँक ही टायटल स्पॉन्सर असल्याचे जाहीर करण्यात आले. आता आयडीएफसी फर्स्ट बँक ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपासून टीम इंडियाची टायटल स्पॉन्सर असणार आहे.
बीसीसीआयने आयडीएफसी बँकेसोबत पुढच्या तीन वर्षासाठी करार केला असून तो 1 सप्टेंबरपासून अस्तित्वात येणार आहे. या करारात भारताच्या 56 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट बोर्डाला पुढच्या तीन वर्षासाठी या डीलमधून 987.82 कोटी रूपये मिळणार आहेत. सोनी स्पोर्ट्सने देखील बीसीसीआयच्या टायटल स्पॉन्सरच्या लिलावात उडी घेतली होती. सोनी बीसीसीआयच्या मीडिया राईट्सच्या लिलावात देखील सहभागी आहे. मात्र बीसीसीआयच्या टायटल स्पॉन्सर लिलावाला फारसा प्रतिसाद मिळाली नाही. याला वाढीव किंमत आणि बाजारपेठेची सध्याची स्थिती ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
मोठमोठ्या कंपन्या या आयपीएलसाठी जास्त उत्सुक आहेत. बीसीसीआयने टायटल स्पॉन्सरसाठी आपली बेस प्राईस 2.4 कोटी रूपयांपर्यंत कमी केली होती. नव्या डीलमध्ये तीन वर्षातील 56 सामन्यांचा समावेश आहे. यात जास्तीजास्त टी 20 सामन्यांचा समावेश असणार आहे. पेटीएमने 2015 मध्ये टायटल स्पॉन्सरशिपसाठी प्रती सामना 2.4 कोटी रूपये दिले होते. हा करार 2019 मध्ये वाढवण्यात आला. त्यावेळी याची किंमत 3.8 कोटी प्रती सामना इतकी झाली होती. मात्र एक वर्ष आधीच सप्टेंबरमध्ये पेटीयमने डील संपवण्याची विनंती केली होती. त्यानंतर बीसीसीआयने मास्टरकार्डसोबत उर्वरित एका वर्षासाठी करार केला.