निसर्गाचा इशारा

इतिहासाच्या आरंभापासून माणूस आणि निसर्गाची लढाई चालू आहे. या लढाईत आपण मात केली असे वाटेपर्यंत निसर्ग आपली ताकद दाखवून देत असतो. तुर्कस्तान आणि सीरियाला सोमवारी बसलेला भूकंपाचा महाधक्का आणि पुढचे 48 तास बसत असलेले पश्‍चातधक्के यामुळे पाच हजारांवर लोक दगावले आहेत. अनेक भागातील रस्ते खचले असून मालमत्तेची प्रचंड हानी झाली आहे. पहाटे चार वाजता हा प्रकोप झाल्याने बहुसंख्य लोक झोपेत असतानाच त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला. ठिकठिकाणच्या ढिगार्‍यांखाली माणसे व मृतदेह अडकले असून ते उपसण्याचे काम पुढचे बरेच दिवस चालेल असे दिसते. भूकंपाचा पहिला झटका 7.9 रिश्टर स्केल इतका होता. दोनच आठवड्यांपूर्वी नेपाळमध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. संपूर्ण उत्तर भारतालाही त्याचे झटके बसले. मात्र त्यात फार हानी झाली नाही. तीव्रतेचा विचार केला तर तुर्कस्तानातील भूकंप हा नेपाळच्या एक हजार पट अधिक होता असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळेच त्यातून मोठी हानी झाली आहे. दुसरे म्हणजे भूकंपाचे केंद्र हे जमिनीपासून सुमारे अठऱा किलोमीटर खोलवर होते. नेपाळमध्ये ते पंचवीस किलोमीटर खोल होते. साहजिकच त्याने अधिक हादरा दिला. विशेष म्हणजे पश्‍चातधक्के हे साधारणपणे कमी तीव्रतेचे असतात. पण मुख्य धक्क्यानंतरही पुन्हा एकवार 7.5 रिश्टर स्केलचा धक्का बसल्याने मोठी हानी झाली. हा सर्व प्रदेश, व त्यातही विशेषतः तुर्कस्तान, भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. यापूर्वी 1939 मध्ये इथे झालेल्या भूकंपात तीस हजार लोक मरण पावले होते. अलिकडे 1999 मध्ये सतरा हजार बळी गेले होते. सध्या तिथे प्रचंड थंडी असून पारा शून्याच्या आसपास आहे. अशा स्थितीत ही आपत्ती आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत. सीरियामध्ये कित्येक वर्षांपासून बंडाळी चालू आहे. इतर प्रांतात राहणे अशक्य झाल्याने विस्थापित झालेले चाळीस लाखांच्या वर नागरिक ज्या जँडारिसमध्ये एकवटले होते त्याच्या परिसरातच भूकंपाने हा झटका दिला आहे. त्यामुळे सुलतानीच्या जोडीला हे अस्मानी संकट येऊन कोसळले आहे. आता जगभरातून या दोन्ही देशांकडे मदतीचा ओघ सुरू होईल. भारतानेही हात पुढे केला आहे. मात्र यात खरा मुद्दा आहे तो भूकंपाच्या संभाव्य नुकसानीवर मात करण्याचा. जपानसारख्या देशाने याबाबत सर्वांना मार्ग दाखवला आहे. मात्र त्यालाही पूर्णतः त्यात यश आले आहे असे नव्हे. भारतात, हिमालय आणि त्याच्या पायथ्याखालचा सर्व परिसर हा तीव्र भूकंपप्रवण म्हणून गणला जातो. नवी दिल्लीपासून ते उत्तर भारतातील अनेक मोठी शहरे या पट्ट्यात येतात. अशी आपत्ती समजा दिल्लीपासूनच्या या पट्ट्यात आली तर होणारी संभाव्य हानी प्रचंड असेल. भूकंपाची पूर्वसूचना देण्याची यंत्रणा अजूनही विकसित झालेली नाही. मात्र किमान आपली बांधकामे भूकंपाला तोंड देणारी असावीत इतकी तरतूद आपण करू शकतो. सरकारने हे प्राधान्याने करायला हवे.

Exit mobile version