| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या देवतांची घटस्थापना करून श्री जोगेश्वरी मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी नवरात्रौत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व देवीचे भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सवा निमित्त नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज यांचे मुखवटे व दागिने सुरक्षित ठिकाणा वरून गोंधळ्याच्या साथीने वाजत गाजत मंदिरात नेण्यात आले. यावेळी विश्वस्त समितीचे सचिव भाई टके, हरिषशेठ काळे, विलास चौलकर, देवीचे भक्त मधुकर पोवळे, राजेश पोवळे, उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, माजी अध्यक्ष बाळासाहेब टके, बिपिन सोष्टे आदींसह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5 ऑक्टोबर पर्यंत चालणार्या या नवरात्रोत्सवात दररोज सायंकाळी हरिपाठ, महाआरती, रास गरबा, याबरोबरच भजन, श्री दुर्गामाता सप्तशती पाठ, भोंडला नृत्य, संगीतमय कार्यक्रम, हळदी कुंकू, बासरी वादन तसेच रोज रात्री साडेनऊ वाजता पुणे येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. ह.भ.प. वासुदेव बुरसे महाराज यांचे कीर्तन याबरोबरच विविध भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नऊ दिवस करण्यात आले आहे.
नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान शहर व परिसरांतील हजारो भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतात. त्यामुळे हा नवरात्रोत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी श्री जोगेश्वरी माता देवस्थानच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, उपाध्यक्ष रुपेश नागोठणेकर, सचिव मंगेश कामथे, सहसचिवपदी संजय नांगरे, खजिनदार प्रथमेश काळे, सहखजिनदार सुदर्शन कोटकर आदींसह विश्वस्त समिती व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.