नवगांव ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट

275 रुग्ण आढळले
प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
सीईओंकडून गावाची पाहणी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नवगांव गावातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. सद्यस्थितीत गावात 275 कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गावातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गावाला शनिवारी 18 रोजी भेट देऊन परिस्थितीची पहाणी करीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेत आवश्यक असणार्‍या इतर उपाययोजना सुचविल्या. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, गावातील ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चा केली.

नवगांव गावात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. सद्यस्थितीत गावात 275 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गावाची लोकसंख्या 3 हजार 737 असून, आत्तापर्यंत 1053 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. काोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी गावात जिल्हापरिषदेच्या धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावात अँटीजन चाचणी शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये गावातील सर्व नागरिकांची चाचणी करण्यात येत आहे. बाधित रुग्णांना त्वरित औषधे देण्यात येत आहेत. नवगांव गावाला मिनी कंटेमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. गावातील नागरिकांना गावाबाहेर जाण्यास तसेच बाहेरील गावातील नागरिकांना गावात येण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नवगांव गावाला भेट देत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी एकही नागरिकाची अँटीजन चाचणी बाकी राहणार नाही याची काळजी घ्यावी. कंटेमेंट नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना केल्या. तसेच गावातील नागरिकांनी कोवीड केअर सेंटर मध्ये उपचार घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पोलीस उपविभाग अधिकारी सोनाली कदम यांच्यासोबत फोनवर चर्चा करून, गावात कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली.

यावेळी अलिबाग पंचायत समिती गट विकास अधिकारी कैलास चौलकर, आरोग्य विस्तार अधिकारी एम. आर. पाटील, नवगांव ग्रामसेवक शेखर बळी, प्रशासक प्रार्थना भोईर, नितीन पाटील यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version