जिल्हा रुग्णालयात लोकसंख्या स्थिरता सप्ताह
| अलिबाग | प्रतिनिधी |
वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधने, आरोग्य, शिक्षण व रोजगार व्यवस्थेवर वाढणारा ताण लक्षात घेऊन रायगड जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात 11 ते 18 जुलै या कालावधीत लोकसंख्या स्थिरता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी घुगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
प्रास्ताविकात प्रतिम सुतार यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचा इतिहास व लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येमुळे दारिद्य्र, बेरोजगारी, अन्नटंचाई आणि पर्यावरणीय समस्या वाढत असल्याने कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मार्गदर्शन करताना डॉ. किरण शिंदे यांनी वाढत्या लोकसंख्येचा आरोग्य व्यवस्थेवर होणारा परिणाम अधोरेखित केला. शासनामार्फत कुटुंब नियोजनासाठी विविध जनजागृती उपक्रम, शिबिरे व मोफत साधनांचे वितरण केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी आजची सक्षम आरोग्य व्यवस्था लक्षात घेता नागरिकांनी लहान परिवार, सुखी परिवार ही संकल्पना स्वीकारण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. निशिकांत पाटील यांनी “दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर” हा संदेश देत मातृ व बाल आरोग्यासाठी दोन अपत्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. भारताची लोकसंख्या जगात सर्वाधिक असल्याने प्रत्येकाने जबाबदारीने कुटुंब नियोजनाचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिसेविका निकीता थळे, प्रमिला पाटील, स्मिता जोशी, तेजश्री म्हात्रे तसेच रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







