पर्यटन वाढल्याचा परिणाम
| माथेरान | वार्ताहर |
शहरात 20 ई-रिक्षा वर्षभरासाठी प्रायोगिक तत्वावर सुरू आहेत. मात्र पावसाळी पर्यटनात झालेली वाढ लक्षात घेता आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-रिक्षा सेवा देणे बंधनकारक असल्याने माथेरान शहरात सुरू असलेल्या 20 ई-रिक्षा अपुर्या पडत आहेत. याकरिता याठिकाणी ई-रिक्षांच्या संख्येत वाढ करण्याची अत्यंत गरज असल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान पर्यटनस्थळी प्रायोगिक तत्त्वावर प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणार्या ई-रिक्षा सुरू झाल्या आहेत. ई-रिक्षांमुळे शाळेत दूरवर जाणार्या विद्यार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना येणार्या जेष्ठ पर्यटकांना येथे माथेरान शहरात दाखल होणे सोईस्कर झाले आहे. या ई-रिक्षा सुरू झाल्यापासून पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली येथे दिसत आहे. यंदा पावसाळ्यात सुद्धा दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक या पर्यटनस्थळी दाखल झालेले पहावयास मिळाले. या मुळे येथील व्यवसायात आणि पालिकेच्या तिजोरीत चांगलीच भर पडलेली दिसून आली माथेरान मधील वाढते पर्यटन पाहता येथे सुरू असलेल्या 20 ई-रिक्षा स्थानिकांना आणि पर्यटकांना सेवा देण्यास अपुर्या पडताना दिसत आहेत. याठिकाणी ई-रिक्षा करिता तांसन्तास पर्यटक रांगेत उभे असल्याचे चित्र अनेकदा येथे पहावयास मिळते. त्याच बरोबर येथे स्थानिकांना देखील ई-रिक्षा साठी बराच वेळ वाट पहावी लागते. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी सकाळी साडेसहा वाजेपासून ई-रिक्षा सुरू होतात. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत येथे ई-रिक्षाची बॅटरी डिस्चार्ज होऊन ई-रिक्षा पुन्हा साडे तीन ते चार तास चार्जिंग साठी बंद करावी लागते. मग अश्यावेळी फक्त तीन ते चार ई-रिक्षा नागरिकांना आणि पर्यटकांना येथे सेवा पुरवीत असतात. त्यामुळे अनेकवेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असते. यावर ई-रिक्षांची संख्या वाढवणे हा एकमेव पर्याय असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.