मृतदेह आंबेनळी घाटातील दरीत फेकल्याची कबूली
|रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
अलिबागमधील तरुणांनी चुलत मावशीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृतदेह आंबेनळी घाटातील दरीत फेकल्याची कबुली त्याने दिली असून त्याच्या विरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दागिन्यांच्या अमिषापोटी गळा दाबून तिची हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा लक्ष्मण पाटील ( 85 ) असे मृत या महिलेचे नाव आहे. ही महिला काही दिवसापासून बेपत्ता होती. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. बेपत्ता महिलेचा तपास सुरू असताना पोलिसांना काही संशयित बाबी लक्षात आल्या.पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे सूत्र वेगात हालवण्यात आली. तिनविरा येथील दोन तरुणांना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळू लागल्याने पोलिसांचा संशय अधिक वाढला. खाकी वर्दीचा दणका मिळाल्यावर दोघेही पोपटासारखे बोलायला लागले. बेपत्ता महिलेचा त्यांनीच खून केल्याचे कबूल केले . सारळ आदिवासीवाडी ते तिनवीरा दरम्यान तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर मृतदेह आंबेनळी घाटातील एका खोल दरीत टाकल्याचे त्यांनी सांगितले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सोन्याचे दागिने मिळवण्यासाठी अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनदर्श हिराजी शेडगे (32) व रितेश नरेश लोहार ( 20) रा. तिनविरा असे या तरुणांची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.
