। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कोळगांव येथील समुद्रकिनारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला. या घटनेने परिसर खळबळ उडाली असून याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे मांडवा सागरी पोलिसांनी कळविले आहे.
अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरापासून काही अंतरावर कोळगाव गावाच्या समुद्रकिनारी फेरफटका मारत असताना गुरुवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह कांदळवनाच्या झाडीत स्थानिकांना दिसून आला. याबाबत स्थानिकांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देताच मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी करून त्यांच्या ओळखीचे काही पुरावे असल्याची माहिती घेतली. परंतु काहीही सापडले नाही. अनोळखी पुरुष जातीच्या मृतदेहाचे वय अंदाजे 40 वर्षे असून अंगात काळपट चौकटीचा शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली असे वर्णन आहे. आठ दिवसांपूर्वी मृत झाला असून तो बाहेरील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.