। नेरळ । प्रतिनिधी ।
मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर सुगवे पिंगळेवाडी येथील वळणावर दुचाकी आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. जखमींवर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुगवे पिंगळेवाडी येथील एका अवघड वळणावर दुचाकी चालक रोहीदास नारायण कांबडी हे सराईवाडी येथील आपल्या सासुरवाडीला आले होते. सकाळी सुगवे येथील सलूनमधून केस कापून घरी एकनाथवाडीला जात असताना पिंगळेवाडी वळणावर सकाळी नऊ ते साडे नऊच्या दरम्यान कंटेनर भरधाव वेगाने कर्जतच्या दिशेने येत होता. यावेळी समोरासमोर दुचाकी आणि कंटेनरची धडक झाली. त्यात रोहिदास कांबडी रस्त्यावर पडून रस्त्याच्या बाजूला फेकला गेला त्याचा रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे उपचारासाठी नेण्यात आले. दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कंटेनरचे काहीही नुकसान झाले नाही.
रोहिदास कांबडी यांना डॉक्टरांनी तपासणी केली असता रोहीदास कांबडी यांची तब्येत बरी असून पायाला व हाताला जबर मार लागला आहे. त्यांच्या एका कानातून रक्त येत आहे. असे डॉक्टरांना तपासणीत दिसून आले आहे. डॉक्टरांनी तात्काळ वाहनचालक रोहीदास कांबडी यांना पनवेल येथील एमजीएम दवाखान्यात पुढील उपचारासाठी पाठविले आहे. सदर अपघाताचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याच्या कशेळे आऊट पोस्ट पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार लालासाहेब थोरने, पोलीस हवालदार राहुल जाधव हे करत आहेत.