। पनवेल । वार्ताहर ।
दोन-तीन दिवस संतत पडणार्या पावसाचा फटका कळंबोलीतील पदपथावर असलेल्या दहा ते बारा वर्षे वयाच्या वृक्षाला बसला. सदरचे झाड उन्मळून पडल्याने ते रस्त्यावर उभ्या असलेल्या बाजूच्या गाड्यांवर कोसळले.
त्यामुळे गाड्यांचे नुकसानही झाले. मात्र सदरची घटना समजतात कळंबोली अग्निशामक दलातील उप अधिकारी दिलीप पाटील यांनी आपल्या पथकासह धाव घेऊन पडलेले झाड मोकळे करून अन्य गाड्यांचेही नुकसान होण्याचे टाळले. कळंबोली वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर बस स्टॉपच्या समोर सेक्टर 3 मधील पदपथावरील जांभळीचे झाड शुक्रवारी पहाटे मुळासकट उपटून पडले. भले मोठे झाड असल्याने ते कोसळल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांवर पडले. तसेच रस्ता ही पूर्ण व्यापला गेला. यामध्ये दोन गाड्यांचे नुकसानही झाले.
सदरची घटना घडल्यानंतर रात्री तैनात असलेले अग्निशामक उप अधिकारी दिलीप पाटील यांनी आपल्या जवानांसह घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेले झाडाचे तुकडे करून आजूबाजूच्या अन्य गाड्यांना नुकसान न होता रस्त्यावरून बाजूला केले. त्यामुळे वाहतूकही पूर्ववत झाली व अन्य गाड्यांचे नुकसान होण्याचेही टळले. मात्र यामध्ये दोन गाड्यांचे नुकसान झालेले आहे. पदपथावर गेले दहा ते पंधरा वर्षांपासून उंच वाढलेले जांभळाचे झाड हे मुळासकटच कोसळले. संततधार पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्यामुळे झाड पडले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.