एका महिन्यात दिले कर्मचार्यांचे पाच महिन्यांचे पगार
| नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायत मधील कर्मचार्यांनी थकीत पगार मिळावे, यासाठी कामबंद आंदोलन सुरु केले होते. सलग पाच दिवस कामबंद आंदोलन केल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून प्रत्येक महिन्यात दोन पगार करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र नेरळ ग्रामपंचायत प्रशासन यांनी आपल्या सर्व कर्मचारी वर्गासाठी एका महिन्यात तब्बल पाच पगार देऊन आश्वासनाची पूर्ती केली आहे.
नेरळ ग्रामपंचायत मधील 107 कर्मचारी यांना पगार वेळेवर दिले जात नव्हते. त्यामुळे कर्मचार्यांनी मनसे कामगार युनियनचे नेतृत्व स्वीकारून थकीत पगाराबाबत आंदोलने केली आहेत. 11 मार्च रोजी नेरळ ग्रामपंचायत कामगारांनी कामबंद आंदोलन करून नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाला हादरा बसला होता. आपल्या थकीत नऊ महिन्यांचे पगाराबाबत ग्रामपंचायत मधील सफाई कामगार, वीज कामगार आणि पाणी पुरवठा कामगार अशा 86 कामगारांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावेळी कार्यालयातील कमर्चार्यांनी मार्च अखेर असल्याने दिवसभर काम आणि सकाळी एक तास असे आंदोलनात सहभाग घेतला होता. दिवंगत सरपंच रावजी शिंगवा यांच्या कार्यकाळातील थकीत पगार आणि नंतर घरपट्टी कर संकलन बंद असल्याने नेरळ ग्रामपंचायत कडून कामगारांचे तब्बल नऊ महिन्यांचे पगार मार्च 2024 पर्यंत थकले होते. कामगारांनी आपल्या युनियनचे माध्यमातून कामबंद आंदोलन सुरु झाल्यावर नेरळ ग्रामपंचायत प्रशासन कडून दर महिन्याला दोन महिन्यांचे पगार देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
15 मार्च रोजी नेरळ ग्रामपंचायतीकडून कामगारांना दोन महिन्यांचा थकीत पगार देण्यात आला. त्यानंतर कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी कामबंद आंदोलन स्थगित केले होते. मार्च 2024 मध्ये अखेर पर्यंत थकीत घरपट्टी आणि पाणी पट्टी गोळा करण्यासाठी कामगार वर्गाने जोरदार प्रयत्न केले आणि त्यामुळे ग्रामपंचायत कडे चांगले कर संकलन होऊ शकले होते. त्यामुळे कराच्या माध्यमातून निधी संकलन झाल्यानंतर 28 मार्च रोजी कामगारांचं आणखी एक थकीत पगार नेरळ ग्रामपंचायतने केला. तर त्यातून देखील मार्च अखेरपर्यंत निधी संकलन कराच्या रूपाने गोळा झाल्याने नेरळ ग्रामपंचायत कडून दोन एप्रिल रोजी नेरळ ग्रामपंचायत मधील सर्व 107 कामगारांना मासिक वेतन देण्यात आले. नेरळ ग्रामपंचायतीने कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु केल्यानांतर दोन नाहीतर चार महिन्यांचे पगार अवघ्या 20 दिवसात करून कामगारांना प्रोत्साहन दिले आहे. एवढ्यावर नेरळ ग्रामपंचायत प्रशासन थांबले नाही, तर ग्रामपंचायतीकडून 12 एप्रिल रोजी आणखी एक पगार नेरळ ग्रामपंचायत कर्मचार्यांना दिला आहे.
