नेरळ ग्रामपंचायतीचा गलथान कारभार

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वार्ड क्रमांक 5 पाचमधील कचरा मागील चार दिवसांपासून उचलला जात नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनोखे आंदोलन केले. शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख संदीप उतेकर यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घरगुती कचरा आणून टाकत प्रशासनाचे लक्ष वेधले.

नेरळ येथील वार्ड क्रमांक 5 मध्ये मागील चार दिवसांपासून कचरा उचलणारी घंटागाडी फिरकलीच नाही. यामुळे रहिवाशांच्या घरात कचऱ्याचे ढीग साचले असून, परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नेरळ मध्येच असलेल्या ‘बुर्हानी पार्क’ सारख्या भागांत घंटागाडी नियमित येत असताना, वार्ड क्रमांक 5 मधील रहिवाशी यांना डावलले जात असल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार विचारणा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संदीप उतेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरातील कचरा एका बादलीत भरून थेट ग्रामपंचायत कार्यालयात नेला आणि कार्यालयाच्या दारात तो कचरा ओतून प्रशासनाचा निषेध केला.

“आम्ही कराचा भरणा करतो, मग कचरा उचलण्यास दुजाभाव का?“ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान संदीप उतेकर यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ग्रामविकास अधिकारी व प्रशासक रजेवर असल्याचे कारण देऊन जबाबदारी टाळली जात आहे. मात्र, नागरिकांच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष करणे हे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. नियमित घंटागाडीची सोय उपलब्ध नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. घंटागाडीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे आणि वार्ड क्रमांक पाचसह इतरही भागांत नियमित कचरा उचलला जावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. जर प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Exit mobile version