नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतल मोडकनगर रहिवाशी संकुलात गेले अनेक दिवस ग्रामपंचायतीची घंटागाडी येत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. कचरा जमा झाल्याने नाल्याला डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थांसमोर घंटागाडीची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. तर साचलेल्या कचर्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेरळ-कल्याण राज्यमार्गालगत असलेल्या चिंचआळी परिसरातील मोडकनगर या रहिवाशी संकुलात गेले काही दिवस नेरळ ग्रामपंचायतीची घंटागाडी आली नाही. त्यामुळे रहिवाशांनी जमा झालेला कचरा कुठे टाकावा असा प्रश्न पडला आहे. तर कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने नेरळ ग्रामपंचायतीला अनेक वेळा संपर्क केला. मात्र, कार्यालयातील कर्मचारी वर्गाकडून गाडीचे पाईप तुटल्याचे तर गाडी नादुरूस्तीचे कारण सांगण्यात येत आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचदेखील या परिसरात वास्तव्यास असल्याने त्यांनादेखील इतर रहिवाशांप्रमाणे कचरा समस्याला सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे माजी सरपंचासह मोडकनगर ग्रामस्थ यांना साचलेल्या या कचर्याचा सामना करावा लागत आहे.
मोडकनगर व आजूबाजूच्या परिसरात काही दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीची घंटागाडी येत नाही. ग्रामपंचायतीकडे विचारणा केली तर गाडी नादुरूस्तीचे कारण सांगितली जातात. तर ग्रामपंचायतीचे प्रशासकांना फोन करून सांगितले आहे. परंतु, परिस्थिती जैसे थे च आहे. त्यामुळे कचरा उचलण्यात यावा.
– आनंद (नंदू) मोडक,
स्थानिक रहिवासी, मोडकनगर
नेरळ परिसरातील कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचार्यांना प्रत्येक विभाग नेमूण दिला आहे. येत्या दोन दिवसात सदर ठिकाणी घंटागाडी पाठविण्याची व्यवस्था करून, नाल्यातील कचरादेखील उचलण्याचे काम केले जाईल.
– गणेश कार्ले, ग्रामविकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत