कोकणातील खेळाडूत निराशा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे स्वप्न भंगले
। माणगाव । वार्ताहर ।
कोकण विभागातील पाच जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या भागातील उत्कृष्ट खेळाडू निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे कोकण विभागाचे मध्यवर्ती क्रीडासंकूल मंजूर होऊन पाच वर्ष झाली. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकाचे काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत माणगाव येथे कोकण विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देवून आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करा अशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या बैठकीत निर्देश दिले होते. मात्र, तब्बल दीड वर्ष लोटले तरीही या विभागीय क्रीडासंकुल उभारणीला मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे कोकणातील खेळाडूंना राष्ट्रीय अंतराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.
विभागीय क्रीडासंकुल उभारणीचे घोडे अडले कुठे? असा संतप्त सवाल कोकणातील खेळाडूतून उपस्थित होत असून, या खेळाडूमधून नाराजीचा सूर पसरला आहे.
कोकण विभागीय क्रीडा संकुलासाठी नियोजित असणारी जागा आजही ओसाडच राहिली आहे. कोकणातील तरुण खेळाडू निर्माण होवून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतील असा उद्देश या क्रीडासंकुलाचा आहे. हे क्रीडासंकुल अद्यापही उभारले नसल्याने कोकणातील खेळाडूपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभारले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हे तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असून, दिवसेंदिवस माणगावचे महत्व वाढत आहे. माणगाव याठिकाणी सर्व सुविधांसह प्रशस्त जागेत सुमारे 10 हेक्टर जागेवर कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारले जाणार असून, हे क्रीडासंकुल ज्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणच्या जागेची पाहणी ठाकरे सरकारच्या काळात ना. आदिती तटकरे यांनी 3 फेब्रुवारी 2020 रोजी पाहणी केली होती. या पाहणीला तब्बल पाच वर्ष झाले. मात्र, अद्यापही या जागेवर शासनांनी कोकण विभागीय क्रीडा संकुल उभारणीचे काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे कोकण विभागातील तरुण खेळाडूंपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. माणगावातील 45 कोटीच्या भव्य क्रीडांगणाची घोषणा सरकारने केली होती. कोकण विभागीय क्रीडासंकुल उभारणीचे पुढचे पाऊल शासन कधी टाकणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कोकण विभागीय क्रीडासंकुलाचे गाजर लोकप्रतिनिधींकडून गेल्या चार वर्षापासून कोकणातील खेळाडूना दाखविले जात आहे.
रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडासंकूल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार असावे आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे मंत्रालयात 26 सप्टेंबर 2023 रोजी अधिकार्यांच्या घेतलेल्या बैठकीत दिले होते. त्या बैठकीत क्रीडासंकुलाच्या उभारणीला मंजूरी देण्यात आली होती. माणगाव विभागीय क्रीडा संकुलासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही महामार्गालगत असल्याने कोकणातील पाचही जिल्ह्यातील तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यातून येणार्या खेळाडूंसाठी हे ठिकाण सोयीचे आहे. या क्रीडासंकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या विभागीय क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करताना आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या. मात्र, हे संकुल कधी उभारणार असा सवाल उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी तरुण खेळाडूंना हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. इथून राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडेल. या क्रीडा संकुलात दर्जेदार खेळाचे प्रशिक्षण मिळणार असून सर्व प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यासह जिल्हाचे व कोकणचे नाव देशपातळीवर पोहोचणार आहे. छ. शिवाजी महाराजांच्या राजधानीत हे क्रीडा संकुल निश्चित प्रेरणादायी असेल. विद्यार्थी तरुणांचा आत्मविश्वास वाढणार असून शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व दिल्यास 5 टक्के आरक्षणाचा लाभ विद्यार्थांना मिळतो.
राजेंद्र खाडे,
राज्यस्तरीय शालेय हॉकी खेळाडू.