नेरळ बाजारपेठ पुन्हा अतिक्रमण

। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वे मेन लाईन वरील नेरळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या बाजारपेठेत रस्त्यावर केलेले अतिक्रमणे आतापर्यंत दोनवेळा जमीनदोस्त करण्यात आली होती. मात्र अतिक्रमणे करून रस्त्यावर दुकाने थाटणारे यांना कोणतेही भय राहिले नाही आणि त्यामुळे आता तिसर्‍यांदा रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. दरम्यान, रस्त्याची मालकी असलेले रायगड जिल्हा परिषद आणि ताबा असलेल्या नेरळ ग्रामपंचायतचे कोणतेही नियंत्रण नाही असे दिसून येत आहे. नेरळ रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बाजारपेठेची निर्मिती रेल्वे मार्गाच्या बाजूला रस्त्यावर आणि गटारावर बांधली होती. नेरळ मधील सामाजिक कार्यकर्ते माधव गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केल्यावर जानेवारी 2008 मध्ये नेरळ बाजारपेठ मधील रस्त्यावर अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम खात्याने जमीनदोस्त केली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने तेथे गटारे बांधण्याचे काम वर्षभर केले नाही आणि त्यामुळे त्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण करून दुकाने थाटली गेली. नेरळ रेल्वे स्टेशन पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एका बाजूला 100 टक्के फुटपाथ व्यवसायिकांनी व्यापला आहे. तर समोरील अर्धा फुटपाथ देखील अतिक्रमण करून गिळला आहे. त्या अतिक्रमण करणार्‍या दुकानदार आणि व्यवसायिक यांना कोणतेही भय राहिले नसून नेरळ ग्रामपंचायतचे अधिकार असून देखील झालेले अतिक्रमण काढण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. त्यात आता सर्व दुकानदारांनी रस्त्याच्या फुटपाथ वर अतिक्रमण करतानाच त्या ठिकाणी प्लास्टिकचे शेड देखील बनले आहेत. त्यात केवळ नेरळ येथील नाही तर मुरबाड, अंबरठा तालुक्यातील व्यवसायीक रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत आहेत.

Exit mobile version