| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-माथेरान घाटात दरडी कोसळण्याच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्यात आली आहेत. मात्र, घाट रस्ता सुस्थितीत राहावा यासाठी गटारे स्वच्छ करण्याची कामे गेली दोन वर्षे झालेली नाहीत. त्याबद्दल माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर घाट रस्त्यावरील सर्व गटारे पावसाळ्याआधी स्वच्छ केली जातील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याने दिले आहे.
माथेरानमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून माथेरान घाट रस्त्याचे काम झाल्यानंतर ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केले. रस्त्याची देखभाल करणे आवश्यक असतानादेखील पावसाळ्यात दरड कोसळते, त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून व्हीजेटीआयमार्फत सर्व्हे केला. टेंडर प्रक्रिया जवळपास दोन वर्षे चालली. नंतर जाळी बसवली. ती खरंच ह्या दगडांच्या मुखवट्याला धरून ठेवण्यास पूरक आहे का?, रस्त्यावर जे खड्डे बुजवण्याचं काम करतात तेही तकलादू असते, असे रोज प्रवास करणाऱ्या टॅक्सी चालक आणि नागरिकांचं ठाम मत आहे. घाट रस्त्यावर, दरीत टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यावरसुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय होणं गरजेचे आहे. यासाठी कापडी पिशवी वापर,पर्यावरण संवर्धन आणि वन संवर्धन/संरक्षण ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्यासाठी घाट रस्ता सुरू होतो तिथे बॅरिकेट्स लावण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. तरी, माथेरान पर्यावरण पूरक झोनमधून निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे.
माथेरान घाटात जाळ्या लावल्या, गटारे स्वच्छ कधी?
