चिमुकल्यांना घडविण्यासाठी आधारशिला बालवाटिका
| रायगड | प्रतिनिधी |
आधारशिला अभ्यासक्रम व पायाभूत स्तर अभ्यासक्रमावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेल्या नव्या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमामध्ये आधारशिला बालवाटिका- 1, आधारशिला बालवाटिका -2 व आधारशिला बालवाटिका-3 अशी पुस्तके तयार करण्यात आली आहेत. या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य व अनुषंगिक साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणाच्यावेळी उपलब्ध करण्यात येणार आहे.
महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत राज्यात सुमारे 1 लाख 10 हजार 631 अंगणवाडी केंद्र चालविण्यात येतात. ज्यामध्ये 3 ते 6 वर्षे वयोगटातील साधारणतः 30 लाख बालकांचा समावेश आहे. या अंगणवाडीमधील सेविकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेला आकार अभ्यासक्रम, त्याचे प्रशिक्षण व पूरक साहित्य महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात येत असे. मात्र, भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या धर्तीवर आधारशिला हा नवीन अभ्यासक्रम विकसित केला असून, याची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाला देण्यात आल्या होत्या.
या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील अंगणवाड्यांसाठी नव्याने अभ्यासक्रम विकसित केला आहे. यामध्ये या अभ्यासक्रमामध्ये आधारशिला बालवाटिका- 1, आधारशिला बालवाटिका- 2 व आधारशिला बालवाटिका- 3 अशी पुस्तके परिषदेकडून तयार करण्यात आली आहेत. अंगणवाडीसाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्यातील कृतीपुस्तिका, समग्र प्रगती पुस्तिका, अन्य पूरक अध्ययन साहित्य हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करण्यात येणार आहेत. या साहित्याची उपयोगिता व परिणामकारकतेचे मूल्यमापन एक वर्ष करण्यात येणार आहे. त्यानंतर या उपक्रमाच्या अंमलबजावणीची पुढील कार्यदिशा ठरविण्यात येणार आहे.
प्रशिक्षण देण्याचे नियोजन
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीनुसार इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण यासंदर्भात सहा महिन्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावीपेक्षा कमी अर्हता धारण केलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यावयाचे असल्यास परिषदेच्या समन्वयाने महिला व बाल विकास विभागाकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळांचे जीओ टॅगिंग करण्यात येत आहे. त्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार महिला व बाल विकास विभागाअंतर्गत असलेल्या सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे.