उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवी घरत यांची नियुक्ती
| उरण | प्रतिनिधी |
कामगार क्षेत्रात अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपलं नाव कमावलेले कामगार नेते तथा माजी आमदार विवेकानंद पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले कामगार नेते रवी शांताराम घरत यांच्यावर शेकापक्षाने उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या तालुका चिटणीस पदाची धुरा सोपवली आहे. रविवारी पेझारीच्या पावनभूमीत पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षांच्या भव्य दिव्य अशा मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील शेकापच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये उरणची धुरा तरुण तडफदार रवी शांताराम घरत यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. कामगार क्षेत्रात गेल्या काही वर्षात हजारो कामगारांना न्याय मिळवून देताना त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना सर्वाधिक सोयी-सुविधा मिळतील, याकडे लक्ष केंद्रित करण्याबरोबरच डीपीडीसारख्या तुघलकी धोरणानंतर कंपनीही वाचली पाहिजे आणि कामगारही जगला पाहिजे या धोरणानुसार कामगार क्षेत्रात आपली वेगळीच छाप पाडल्याचे उरण तालुक्यात पाहायला मिळत आहे.
या धुरंदर नेतृत्वातील नेतृत्व गुण ओळखून शेकापच्या वरिष्ठांनी त्यांच्यांवर उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाची सोपविलेली धुरा ते अतिशय प्रामाणिकपणे आणि समर्थपणे पेलतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे शेकापक्षाचे अर्ध्वयू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावात म्हणजे जासईत बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदाच शेकापचे तालुका चिटणीसपद रवी घरत यांच्या माध्यमातून मिळाले असल्याने जासईतही या निमित्ताने जल्लोष साजरा करण्यात आला.
शेकापक्ष आत्ता संपला अशी कोल्हेकुई करणाऱ्यांना पक्षाने अलिबागच्या पेझारी गावात दणदणीत कार्यकर्ता मेळावा घेत चपराक दिली आहे. या मेळाव्यात पक्षाच्या पडत्या काळात पक्षासाठी ठामपणे उभे राहिलेल्या शेकापक्षाच्या बहाद्दर कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रचंड ताकतीने आणि जिद्दीने लढणार असल्याचे सूतोवाच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या सूचनेनुसारच सुमारे 90 टक्के पक्षाचा भार हा तरुणाईच्या खांद्यावर देण्यात आला आहे. त्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पक्षाची भाकरी फिरविण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने उरण तालुक्याच्या चिटणीस पदाचा सुकाणू कामगार नेते रवी शांताराम घरत यांच्या हाती देण्यात आला आहे.
प्रामाणिक प्रयत्न करणार
सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांवर कशा प्रकारे अन्याय करीत आहे हे, नागरिकांच्या मनात बिंबवून पक्षाला पुन्हा एकदा जुने दिवस आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार असून उरण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत याची चुणूक दाखवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी बोलताना दिली आहे. भोळ्या भाबड्या आशेवर पक्षाचे जे कार्यकर्ते सत्ताधारी गटाकडे गेले आहेत, त्या सर्वांना भविष्यात शेकापक्ष सोडल्याचा पश्चाताप होईल. विकासात सर्वांना सामावून घेऊन सर्वांसोबत एकजुटीने काम करून शेकापक्षाला नंबर वन करण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेणार असल्याची ग्वाही नवनियुक्त तालुका चिटणीस रवि शांताराम घरत यांनी बोलतांना दिली.