दुर्मिळ आजारावर यशस्वी सर्जरी
। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये क्रेनियोसायनोस्टोसिससाठी एन्डोस्कोपिक सर्जरी तीन महिन्याच्या बाळावर यशस्वीपणे केली गेली. ही एक अतिशय दुर्मिळ स्थिती आहे, यामध्ये बाळाच्या डोक्याची हाडे वेळेआधीच जुळतात. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील कन्सल्टन्ट न्यूरोसर्जरी डॉ. सुमीत पवार यांनी 3 महिन्यांच्या बाळावर ही क्रांतिकारी प्रक्रिया केली आहे.
एका तीन महिन्याच्या बाळाचा चेहरा, खासकरून भुवया प्रमाणबद्ध नसल्याचे पालकांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये बाळाला आणले. यावेळी तपासणीमध्ये आढळून आले की, या बाळाला क्रेनियोसायनोस्टोसिस हा दुर्मिळ जन्मजात आजार जडला होता. ज्यामध्ये बाळाच्या डोक्याची हाडे खूप आधी जोडली जातात. यामुळे बाळाच्या सामान्य वाढीवर मर्यादा येतात आणि डोक्याचा आकार असामान्य होऊन जातो. यावर उपचार केले गेले नाहीत तर विकसनशील डोक्यावरील दबाव वाढू शकतो. या वाढीमध्ये विलंब आणि न्यूरोलॉजिकल समस्या होऊ शकतात. वेळेवर सर्जरी केल्यास, डोक्याचा आकार ठीक करता येतो तसेच डोक्यावरील दबाव कमी केला जाऊ शकतो. यामुळे बाळाचा विकास सामान्य पद्धतीने होऊ शकतो.
सर्जरीनंतर बाळाला एक कस्टम थ्रीडी प्रिंटेड हेल्मेट घालण्यात आले. हे हेल्मेट पुढील दोन वर्षांमध्ये डोक्याच्या विकासाला निश्चित दिशा देण्यासाठी आणि आकार सुव्यवस्थित करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. नियमित तपासणीदरम्यान याची काळजी घेतली जाईल की हेल्मेट डोक्याच्या सामान्य विकासासाठी योग्य प्रकारे अड्जस्ट करण्यात आले आहे.
या आजाराचे जन्मानंतर पहिल्या तीन महिन्यांमध्ये निदान होणे गरजेचे आहे. 3 ते 6 महिन्यांच्या बाळाच्या बाबतीत फक्त 2.5 सेमीची चीर देऊन एन्डोस्कोपिक पद्धतीने ही प्रक्रिया करता येते. निदान करण्यात उशीर झाला आणि बाळ 6 ते 9 महिन्यांचे झाले तर ओपन स्कल सर्जरी करावी लागते. यामध्ये 20 सेमीची मोठी चीर द्यावी लागते. इतक्या कमी वयामध्ये ही सर्जरी गंभीर, धोकादायक असते.
– डॉ. सुमीत पवार, अपोलो हॉस्पिटल्सचे कन्सल्टन्ट न्यूरोसर्जर
आम्हाला आमच्या बाळाचा चेहरा असामान्य असल्याचे आढळून आले आणि त्यावर योग्य, तज्ञ उपचारांचा शोध घेणे आम्ही सुरु केले. डॉ. सुमीत यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा आम्हाला क्रेनियोसायनोस्टोसिसबद्दल समजले. आम्हाला उपचारांमध्ये उशीर करून धोका पत्करायचा नव्हता, कारण यामुळे आमच्या बाळाच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असता. एन्डोस्कोपिक स्कल सर्जरीचा निर्णय योग्य ठरला, आणि त्यानंतर आमच्या बाळाची जी उल्लेखनीय रिकव्हरी झाली ती पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. आमच्या बाळाला नवजीवन प्रदान केल्याबद्दल आम्ही डॉ. सुमीत आणि अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे आभारी आहोत.
– मृगेंद्र प्रताप, बाळाचे वडील







