ओव्हेन्स कॉर्निंग युनायटेड संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाढत्या डायलेसिस रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन नवे जलशुध्दीकरण यंत्र दाखल झाले आहेत. ओव्हेन्स कॉर्निंग युनायटेड या संस्थेच्या मदतीने सामाजिक बांधिलकीतून हे यंत्र देण्यात आले असून या यंत्राचा हस्तांतर सोहळा गुरुवारी (दि.01) फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी- घुगे, संजय राव, अभिषेक रघुवंशी, डॉ. भालचंद्र पेढांबकर, धर्मराज प्रधान, अनिल परमार, डॉ. शैलेश वागळे, आदी मान्यवरांसह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, प्रभारी अधिसेविका, परिचारीका व रुग्ण उपस्थित होते.
डायलेसिस रुग्णांना अलिबागमध्ये उपचार करता यावा यासाठी 2009 पासून डायलेसिस सेंटर सुरु करण्यात आले. डायलेसीससाठी रुग्णांची संख्या वाढल्याने डायलेसिस मशीनदेखील वाढू लागल्या. या सेंटरमध्ये दहा मशीन कार्यान्वित आहेत. वर्षाला सुमारे सहाशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र या सेंटरमध्ये कार्यान्वित असलेले शुध्दीकरण यंत्र कमी क्षमतेचे व जूने असल्याने रुग्णांना सेवा देण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या प्रयत्नाने सामाजिक बांधिलकीतून ओव्हेन्स कॉर्निंग इंडिया या संस्थेमार्फत एक हजार क्षमतेचे दोन जल शुध्दीकरण यंत्र देण्यात आले.
सीईओंकडून कंपन्यांना आवाहन अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दर्जेदार अद्ययावत असे जल शुध्दीकरण यंत्र युनायटेड संस्थेकडून मिळाले. रायगड जिल्ह्यातील कंपन्यांनी देखील त्यांच्या सीएसआर फंडातून आरोग्य विभागाला अशा प्रकारची मदत केल्यास खर्या अर्थाने आरोग्य विभागाला नवसंजीवनी व नवचैतन्य मिळेल. त्यामुळे कंपन्यांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले.