न्यूझीलंडची विजयी घौडदौड सुरूच

किवींनी अफगाणिस्तानचा उडवला धुव्वा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

विश्वचषकाच्या 16व्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा 149 धावांनी पराभव केला आहे. यासह अफगाण संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने अफगाणिस्तानसमोर 289 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ केवळ 139 धावा करू शकला आणि 149 धावांनी सामना गमावला. या शानदार विजयासह किवी संघ आठ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावून 288 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 34.4 षटकांत 139 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 71 धावा केल्या. तर टॉम लॅथमने 68 धावांची खेळी केली. सलामीवीर विल यंग 54 धावा करून बाद झाला. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक आणि अजमतुल्ला उमरझाईने प्रत्येकी दोन बळी घेतले. रशीद खान आणि मुजीब उर रहमान यांना प्रत्येकी एक गडी बाद केला. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने सर्वाधिक 36 धावा केल्या. अजमतुल्लाने 27 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि लोकी फर्ग्युसनने प्रत्येकी तीन तीन गडी बाद केले. ट्रेंट बोल्टला दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. मॅट हेन्री आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक गडी बाद या दोघांना मदत केली.

विजयासाठी मिळालेल्या 289 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर केवळ 27 धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी व रहमत शहा यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिचेल सँटनर याने एक अफलातून झेल टिपत शाहिदीची खेळी संपुष्टात आणली. लॉकी फर्ग्युसन याने टाकलेल्या चौदाव्या षटकातील अखेरचा चेंडू आखूड टप्प्याचा आल्यानंतर शाहिदीने पुल करण्याचा प्रयत्न केला. हवेत उडालेला हा चेंडू स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या सँटनरपासून काहीशा अंतरावर होता. त्याने धावत जाऊन योग्य अंदाज घेत हा झेल पूर्ण केला. हा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version