। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नेतृत्तावाखालील राजवटीमध्ये खेळांना प्रोत्साहन दिलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट नियमक मंडळाने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अफगाणिस्तानचा संघ यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पहिल्यांदाच अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी सामना खेळणार असून या दौर्यासाठी तालिबानने हिरवा कंदील दाखवल्याचं अफगाण क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. अफगाण क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमिद शिनवारी यांनी यासंदर्भातील माहिती दिलीय. ऑस्ट्रेलिया दौराच नाही तर भारताविरोधातील कसोटी मालिका खेळण्यासाठीही अफगाणिस्तानचा संघ दौरा करण्याची शक्यता हमिद यांनी व्यक्त केली आहे. तालिबान सरकारचा क्रिकेट खेळण्याचा पाठिंबा आहे. त्यामुळेच नियोजित वेळापत्रकानुसार आमच्या संघाचे सर्व दौरे पार पडणार आहेत. तालिबान संस्कृतिक विभागाच्या प्रवक्त्यांनी ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यासाठी समर्थन देत असल्याचं आम्हाला कळवलं आहे. तसेच त्यांनी 2022 च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठीही त्यांनी परवानगी दिलीय, असं हमिद म्हणालेत.
अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामना होबार्टमध्ये 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान खेळणार आहे. हा सामना खरं तर मागील वर्षी म्हणजेच 2020 रोजी खेळवला जाणार होता. मात्र करोना आणि त्यामुळे असणार्या प्रवास निर्बंधांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. ऑस्ट्रेलिया दौर्याआधी अफगाणिस्तानचा संघ युएईमध्ये होणार्या टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसेल. 17 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. मात्र अफगाणिस्तान क्रिकेट संघाची पाकिस्तानबरोबरची एकदिवसीय क्रिकेट मालिका पुढील वर्षी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आम्ही सध्या टी-20 मालिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसोबत ही मालिका होणार आहे. ही मालिका टी-20 विश्वचषकाआधी युएईमध्येच खेळवली जाईल. कतारमध्ये आम्ही शिबीर आयोजित करणार आहोत. हे शिबीर या मालिकेआधीच आयोजित केलं जाणार आहे, असं हमिद यांनी सांगितलं आहे.