। माणगाव । प्रतिनिधी ।
विवाहितेचा मानसिक छळ करून तिला मारहाण केल्याप्रकरणी नऊ आरोपींवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सन 2015 पासून ते 29 ऑगस्ट 2021 यादरम्यान घडला. याबाबतची फिर्याद सुरेखा अर्जुन गोरेगावकर (वय37) रा.विद्यानगर लोणेरे ता.माणगाव यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.
घटनेतील फिर्यादी महिला सुरेखा अर्जुन गोरेगावकर यांचे लग्न 2015 साली झाल्यापासून काही दिवसांनी तिच्या सासरचे लोक आरोपी पती अर्जुन बाळाराम गोरेगावकर (वय 32), सासरे- बाळाराम बाबू गोरेगावकर (वय 65), दिर भीमराव बाळाराम गोरेगावकर (वय 50), जाऊ वैशाली भीमराव गोरेगावकर (वय 45), नणंद रजनी खामगावकर (वय 55), पुतणी सोनिया भीमराव गोरेगावकर (वय 24), स्नेहल भीमराव गोरेगावकर (वय 23), सावत्र मुलगा आदर्श अर्जुन गोरेगावकर (वय 20), आकाश अर्जुन गोरेगावकर (वय 21) यांतील आरोपी नं 8 व 9 हे फिर्यादीचे सावत्र मुलगे असून फिर्यादी या सावत्र असल्या कारणाने जेवण चांगले करत नाहीत. तसेच फिर्यादी यांना घरात सुनेचा मान द्यायचा नाही. अशा छोट्या छोट्या कारणांवरून मानसिक त्रास देऊन वेळोवेळी मारहाण करण्यात येत असे.
पिडित महिलेच्या पतीने तिला वेळोवेळी मारहाण करून घरातून हाकलून दिले आहे. फिर्यादीने मुलांना घेऊन घरातून निघून जावे म्हणून पतीने फिर्यादी व तिच्या मुलांना घरात सोडून कोठेतरी निघून गेला आहे. त्यामुळे तिचे व मुलांचे खाण्यापिण्याचे हाल होत असून तिचे जीवन जगणे असह्य झाले आहे. याप्रकरणी वरील आरोपींवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.नावले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार एम.जी.टेमकर या करीत आहेत.