कोलाड सपोनि सुभाष जाधव यांची धडाकेबाज कामगिरी
। कोलाड । कल्पेश पवार ।
किरकोळ वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातील सुतारवाडी विभागातील आंबिवली आदिवासीवाडी येथे घडली. याप्रकरणी गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाला होता. परंतु कोलाड सपोनि सुभाष जाधव व त्यांच्या टिमने मोठया शिताफीने आरोपींला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.31) रात्री नऊ ते बुधवारी (दि.1) रात्री नऊ यादरम्यान ही घटना घडली. आंबिवली आदिवासीवाडी (पो. कुडली, ता.रोहा) येथे राहणार्या चंदर सुदाम वाघमारे याचे पत्नी कुसुम हिच्याशी कोळशाच्या खाणीच्या धंद्यावर जाण्यावरुन भांडण झाले. हा वाद विकोपाला पोहोचला.
संतापाच्या भरात चंदरने पत्नी कुसुमला हाताबुक्क्याने, लाथेने बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुसूमचा मृत्यू झाला. आरोपी चंदर सुदाम वाघमारे रा.आंबिवली आदिवासीवाडी हा गुन्हा केल्यापासून फरार होता. त्याच्याकडे मोबाईल वापरात नव्हता. कोणतेही आधारकार्ड नव्हते. कसंबसं एक फोटो मिळाला होता. त्या आधारे पोलीस ठाण्याचे अधिकारी सुभाष जाधव व अंमलदार यांनी गुन्हा घडल्यापासून सतत घटनास्थळ व आसपासचा गाव, जंगल भागात शोध घेता आरोपी जवळच्या जंगलात एका झाडावर लपून बसलेला दिसला. त्यावेळी सर्व अधिकारी व अंमलदार यांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतला पुढिल तपास सुरु आहे.