भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली; नऊ जणांचा मृत्यू

सहा लहान मुलांचा समावेश

। नाशिक । प्रतिनिधी ।

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये शिवाजी नगर भागात शुक्रवारी (दि.3) रात्री भीषण अपघात झाला. एक भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतातील विहिरीमध्ये कोसळली. या भीषण अपघातात लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 9 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या कारने घराकडे परतत होते. दरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास शिवाजी नगर भागातील राजू राजे यांच्या विहिरीजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट विहिरीत कोसळली. विहीर तुडुंब भरलेली असल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासन, पोलीस आणि NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. शेवटी क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहेर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत आतील कारमधील नऊही जणांचा श्वास थांबला होता. या घटनेमुळे इंदोरे गावावर शोककळा पसरली असून हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणाने, याचा तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version