युवा प्रतिष्ठानच्या तरुणांचा आदर्श
| मुंबई | प्रतिनिधी |
जलसंकटावर मात करण्यासाठी आणि ग्रामीण पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल सावरण्यासाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीचा एक आदर्श गोठे गावातील युवकांनी संपूर्ण परिसरासमोर घालून दिला आहे. युवा प्रतिष्ठान, गोठेगाव यांच्या पुढाकारातून हा विशेष उपक्रम स्थानिक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडला. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एक दिवस गावासाठी या भावनेतून मुंबई व उपनगरांमध्ये नोकरी-धंद्यासाठी स्थायिक झालेले 60 हून अधिक चाकरमानी तरुण एकत्र आले होते. या तरुणांनी स्थानिक तरुणांच्या सोबतीने गावात श्रमदानाची मोठी चळवळ उभी केली.
गोठे गावाची भौगोलिक रचना डोंगराळ असल्याने पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडूनही तीव्र उतारामुळे पाणी वेगाने वाहून जाते, परिणामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. ही भौगोलिक अडचण ओळखून गेल्या सलग सहा वर्षांपासून गावात वृक्षारोपण आणि पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम अविरतपणे राबवली जात आहे.
या मोहिमेत कामाचे अतिशय नियोजनबद्ध तीन स्वतंत्र गट पाडण्यात आले होते. पहिल्या गटाने कठीण स्थानिक प्रजातींच्या रोपांची नवीन खड्ड्यांमध्ये लागवड केली, ज्यामध्ये वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, अर्जुन, कदंब, करंज, बेहडा, हिरडा, हेरड आणि आंबा यांसारख्या झाडांचा समावेश होता. दुसऱ्या गटाने गेल्या वर्षी लावलेल्या झाडांच्या बुंध्यापाशी मातीची भर देऊन त्यांना मजबूत केले, तर तिसऱ्या गटाने जुन्या खड्ड्यांतील गाळ काढून, नवीन खड्डे खोदून बाजूला दगडी बांध घातले जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी अडवून जमिनीत जिरवता येईल आणि जमिनीची धूप थांबेल.
पाणीटंचाई, वणव्यांपासून कायमचा दिलासा
गेल्या 6 वर्षांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 900 हून अधिक झाडांची यशस्वी रुजवात झाली आहे. त्यातील तब्बल 80 टक्के झाडे आज जिवंत आहेत आणि वणव्यांपासून सुरक्षित राहून जोमाने वाढत आहेत. या जलसंधारणाच्या कामामुळे गावाच्या मुख्य सखल भागातील पाण्याचे मुख्य नैसर्गिक झरे आता पुन्हा जिवंत झाले आहेत. भूगर्भातील ओलावा वाढल्यामुळे ग्रामीण भागाला उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या स्थानिक वणव्यांच्या तीव्रतेवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असून, उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाई दूर झाल्याने गावकऱ्यांची पाण्याची चिंता कायमची मिटली आहे.
गावागावांतील युवकांनी वृक्षारोपण आणि जलसंधारणाचे असे उपक्रम हाती घेतल्यास पाणीटंचाई व उन्हाळ्यातील वणव्यांच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल. वणव्यांपासून झाडे वाचवणे आणि पाणी जिरवणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी एकी हेच बळ या उक्तीचा प्रत्यय गोठे गावातील या उपक्रमातून दिला.
– विनोद भुवड (अध्यक्ष, युवा प्रतिष्ठान)
