80 टक्के नागरिकांकडे ध्वज उपलब्ध
| खास प्रतिनिधी | रायगड |
गेल्या वर्षी प्रशासनाने मोफत तिरंगा ध्वज पुरवले होते. 80 टक्के नागरिकांकडे ते उपलब्ध असून, 20 टक्के नागरिकांना नव्याने पुरवण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करण्यात येणार आहे. घरोघरी तिरंगा हा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा असून, या कालावधीमध्ये गावातील सर्व नागरिकांनी तिरंगा ध्वज घेऊन आपल्या घरावर सन्मानाने फडकवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांनी केले आहे.
जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन सरकारने केले आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल आठ लाख 71 हजार घरांवर तिरंगा फडकणार आहे. त्यामध्ये पाच लाख 21 हजार ग्रामीण रायगडमध्ये, दोन लाख 40 हजार पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये, तर एक लाख आठ हजार ध्वज हे नगरपालिका क्षेत्रामध्ये फडकवण्यात येणार आहेत.
दोन हजार महसूल क्षेत्रात तयारी पूर्ण
रायगड जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतींमध्ये तिरंगा फडकवण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांवरदेखील तिरंगा फडकवण्यात येणार आहे. सुमारे दोन हजार सरकारी कार्यालयांमध्ये हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार तयारीदेखील पूर्ण झाली आहे. सध्या 80 नागरिकांकडे ध्वज उपलब्ध असून, 20 टक्के नागरिकांना नव्याने पुरवण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील स्मारके, पुतळे येथे उत्सव
रायगड जिल्ह्यातील नऊ ठिकाणी तिरंगा फडकवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील, मनवली-कर्जत, सुभदार नरवीर तानाजी मालुसरे, उमरठ-पोलादपूर, रायगड किल्ला महाड, सरखेल कान्होजी आंग्रे स्मारक, अलिबाग, हुतात्मा स्मारक जंगल सत्याग्रह, चिरनेर-उरण, आचार्य विनोबा भावे, गागोदे-पेण, समरभूमी उंबरखिंड, चिंचवली-खालापूर आणि चवदार तळे, महाड येथील स्मारक यांचा समावेश आहे.