श्रीलंकेचा सुपर-8मध्ये प्रवेश; कांगारूंना पाजले पराभवाचे पाणी
| कोलंबो | वृत्तसंस्था |
भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी-20 विश्वचषक स्पर्धेत 30वा सामना सोमवारी (दि.16) श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा पार पडला. या सामन्यात श्रीलंकेच्या पथुम निस्सांकाचा खेळ पाहायला मिळाला. त्याने एक उत्तम झेल पकडत आणि शतकी खेळी करत कांगारूंना पराभवाचे पाणी पाजले. या विजयामुळे श्रीलंकेचे सुपर-8मधील स्थान पक्के झाले असून ऑस्ट्रोलियाचे स्पर्धेतील स्थान धोक्यात आले आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होती तेव्हा, मार्श व हेड याने संघाला उत्तम सुरूवात करून दिली. परंतु, हे दोघे बाद झाल्यानंरत ऑस्ट्रेलियाचा डाव अडखळला. त्यानंतर जोश इंग्लिस आणि मॅक्सवेल यांनी संयमी खेळी करत धावफलक हलता ठेवला. त्यामुळे श्रीलंकेची चिंता वाढताना दिसली. ऑस्ट्रेलियाच्या 16 व्या षटकात श्रीलंकेला मॅक्सवेलचा बळी घेण्याची संधी होती; मात्र, दुष्मंता चामीराच्या त्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर निस्सांकाने त्याचा सोपा झेल सोडला. त्यामुळे श्रीलंकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. ऑस्ट्रेलियाने 16 षटकात 4 गडी गमावत 160 धावा केल्या आणि खेळपट्टीवर मॅक्सवेल उभा होता. तेव्हा ऑस्ट्रेलिया 200च्या पुढे धावा करेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, दुशन हेमंथाच्या त्या 17व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीप खेळला. निसांकाने मात्र ही संधी जाऊ दिली नाही आणि हवेत सूर मारत तो चेंडू झेलला आणि मॅक्सवेल 22 धावा करत बाद झाला. निसांकाच्या त्या झेलमुळे ऑस्ट्रेलियाचे बळी जातच राहिले. त्यामुळे ऑस्ट्रोलियाला 20 षटकात सर्वबाद 181 धावाच उभारत्या आल्या. यामध्ये कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी अर्धशतकी खेळी केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात काही खास झाली नाही. सलामीवीर कुसल परेरा 1 धावेवर मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. परंतु, पथूम व कुसल मेंडिस याने 97 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला विजयी मार्गावर आणले. स्टॉयनिसने 13 व्या षटकात ही जोडी तोडली. मेंडिस 51 धावांवर माघारी परतला. श्रीलंकेला अजूनही 46 चेंडूंत 77 धावा करायच्या होत्या आणि 8 गडी शिल्लक होते. पवन रत्नेनायकेने येताच सलग दोन चौकार खेचून श्रीलंकेवरील दडपण कमी केले. त्यानंतर निस्सांका मैदानावर उभा राहिला आणि त्याच्या 52 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 100 धावांनी श्रीलंकेला विजय मिळवून दिला. श्रीलंकेने 18 षटकांत 2 बाद 184 धावा केल्या. रत्ननायके 28 धावांवर नाबाद राहिला. या विजयामुळे ‘ब’ गटात श्रीलंका 6 गुणांसह अव्वल स्थानावर राहून सुपर 8मध्ये गेला आहे.







