परशुराम उपरकर यांचे आमदारांना प्रत्युत्तर
। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
आमदार नीतेश राणे यांनी पूर्व इतिहास समजून घेऊनच टीका करण्याचे धाडस करावे. मी राणेंना सोडून गेलो, असा उल्लेख करणार्या नीतेश राणे यांनी त्यावेळचे राजकारण समजण्याएवढे आपले वय तरी होते का? हे प्रथम पहावे, अशी बोचरी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीत आता आरौप प्रत्यरोपांच्या फैरी झडणार असल्याचे चित्र आहे.
मी बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून कायमच होतो. मात्र, आमदार राणे यांचे वडील नारायण राणे यांची शिवसेनेतून हाकालपट्टी केली होती. नंतरच्या कालावधीत मी शिवसेना सोडली असली तरीही मी बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसैनिक म्हणून कायमच राहिलो. राजकारणातील पूर्व इतिहास माहिती नसताना आमच्यावर टीका करण्याचे असे प्रयत्न केल्यास संपूर्ण पूर्व इतिहास समोर आणावा लागेल, असा इशारा उपकर यांनी दिला आहे. मला कोणीही शिवसेनेतून हाकलले नाही. मी त्यावेळी स्वतःहून शिवसेना सोडली होती. मात्र, नारायण राणे मुख्यमंत्री होते, तेंव्हापासूनच मी एकाच पक्षात असलो तरीही अंतर राखून होतो. माझ्याबाबत बोलताना विचारपूर्वकच वक्तव्य करावे. अन्यथा पूर्व इतिहास आणि माझे प्रतिज्ञापत्र जनतेसमोर आणावे लागेल, असे इशारा उपरकर यांनी दिला.






