। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलीसांना प्रामाणिक दलाचा दर्जा मिळावा यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा मलईदार बदल्यांमधील भ्रष्टाचार थांबवून सगळ्याच पोलीस निरिक्षकांना सूखद आश्चर्याचा धक्का दिला. अधिकार्यांना मलईदार पदांसाठी एकही रुपया मोजावा लागला नाही, तर ते भ्रष्टाचार करणार नाहीत अशी धारणा आयुक्तांची होती. परंतू, मागील दोन आठवड्यात घडलेल्या भ्रष्टाचाराच्या विविध घटनांमुळे आयुक्तांनी पुन्हा एकदा बदलीचे अस्त्र उगारले आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस दलातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सफाईची मोहीम हाती घेतली. मात्र, मोफत मलाईदार पद मिळवूनही अधिकारी व कर्मचार्यांकडून भ्रष्टाचार थांबत नसल्याने आयुक्तांनी एका बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसमोर संताप व्यक्त केला. 5 ऑक्टोबरला कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांची तडकाफडकी पोलीस ठाण्यातून बदली करुन त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात बसवण्यात आले. राजेंद्र कदम यांच्या जागी वाहतूक विभागात काम करणारे श्रीकांत धरणे यांची नेमणूक करण्यात आली. यापूर्वी 9 ऑक्टोबरला एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश कदम यांना मध्यरात्री 50 लाख रुपयांच्या मागणी केल्याप्रकरणी लाचेच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. ईमारतीच्या दुर्घटना प्रकरणात गुंतवणूकदाराकडून पोलीस निरिक्षक सतीश कदम याने 14 लाख रुपये स्विकारल्यानंतर अजून त्याला 12 लाख रुपये पाहीजे होते. हीच रक्कम घेताना पोलीस निरिक्षक कदमला पोलीसांनी पकडले. कळंबोली पोलीसांचा लोखंड बाजार व परिसरात चालणार्या काळ्या धंद्याची लेखी माहिती एका भंगार व्यवसायीकाने पोलीस आयुक्तांकडे दिली.
महिन्याला या पोलीस ठाण्याच्या प्रभारींना 45 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये विना कागदपत्रांची वाहने विल्हेवाट करणारी मोठी टोळी लोखंड पोलाद बाजारातील 22 गाळ्यांमध्ये सक्रीय आहे. या मोठ्या दुकानदारांकडून वाहनांचे सुटे भाग विकणारी 35 दुकाने या परिसरात आहेत. यांना पोलीसांचा आशिर्वाद लागतो. जुन्या लोखंडाला नवीन कलई लावून बनावट विक्री करणारे लोखंड व पोलादाचा बेकायदा व्यापार कळंबोली लोखंड बाजारात चालतो. त्यालाही पोलीस आशिर्वाद देत असल्याचे बोलले जाते. पोलीस आयुक्त भारंबे यांच्या आदेशाने लोखंडी सळई व इतर साहीत्य वाहतूकदारांकडून खरेदी करणारा इम्तिहाज नावाच्या भंगार माफीयावर कारवाई केली होती. हा व्यवसाय पुन्हा सूरु झाल्याचे येथील व्यापारी सांगतात. या बाजारात दिडहजाराहून अधिक गोदाम आहेत. येथील चोरट्यांच्या टोळीचे व पोलीसांचे साटेलोटे असल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.