। नेरळ । प्रतिनिधी ।
गरजू कुटुंबाला आधार देताना त्यांना महिन्याला लागणारा शिधा देण्याचे कार्य सहसंवेदना ट्रस्ट करीत आहेत. या संस्थेला पाच वर्षे झाली असून संस्थेचे अध्यक्ष आतापर्यंत 125 कुटुंबीयांपर्यंत पोहचले आहेत. तसेच, तरुण वर्गाने या संस्थेने कार्य हाती घेऊन पुढे न्यावे, असे आवाहन ठाणे येथील स्वाद उद्योग समूहाचे बळवंत कर्वे यांनी केले.
नेरळ गावातील बापूराव धारप ट्रस्ट सभागृहात सहसंवेदना ट्रस्ट यांच्या देणगीदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष सुधीर साने, सचिव मिलिंद साने, खजिनदार बाळ भूमकर, कर्वे आदी उपस्थित होते. ठाणे येथील स्वाद उद्योग समूहाचे प्रमुख बळवंत कर्वे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ट्रस्टचे नाव आकर्षक असून ज्या सर्वांना समजाची संवेदना आहे त्या सर्वांना एकत्र करण्याचे काम सहसंवेदना ट्रस्ट करीत आहे. तसेच, भारतभर संस्थेचे कार्य पोहचवण्याचे उद्दिष्ट 74 वर्षीय सुधीर साने दाखवत आहेत. संस्थेने निवडलेले कार्य वेगळे असून ठाणे सारख्या शहरामध्ये असा विचार पुढे आला नाही. पण कर्जत सारख्या गावात हे कार्य सुरू झाले याचे कौतुक व्हायला हवे असे उद्गार बर्वे यांनी काढले.