18 ऑगस्टला पुढील सुनावणी
| रायगड | खास प्रतिनिधी |
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी एडलवाईज ग्रुपचे संचालक यांच्यासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी आरोपींची याचिका न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. 18 ऑगस्ट रोजी अंतरिम दिलासा देण्याबाबत सुनावणी पार पडणार आहे. नितीन देसाई यांच्या पत्नीने आरोपींविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांनाही न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.
नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी कर्जत येथील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेली परिस्थिती विशद करणार्या ध्वनीफिती पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. त्यानंतर देसाई यांच्या पत्नी नेहा यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी 4 ऑगस्ट रोजी रशेष शहा आणि राज कुमार बन्सल यांच्यासह एडलवाईज समूहाच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर रशेष शहा आणि राज कुमार बन्सल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत तपासाला स्थगिती देण्याची आणि पोलिसांना त्यांच्यावर अटकेसारखी कारवाई करण्यापासून अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली होती.