आ. जयंत पाटील यांच्या मागणीला नितीन गडकरी यांचा हिरवा कंदील

दुपदरीकरणाच्या मंजुरीमुळे अलिबाग वडखळ प्रवास होणार जलद व सुखकर

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

आमदार जयंत पाटील यांनी केंद्रीय रस्ते वहातूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या अलिबाग ते वडखळ हा रस्ता दुपदरी करण्याच्या मागणीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता अलिबाग ते वडखळ मार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे.

अलिबाग ते वडखळ (कि.मी. 0.00 ते कि.मी. 22.200) या 22.2 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम वार्षिक आराखडा २०२२-२३ अंतर्गत पेवड शोल्डरसह दुपदरी करण्याचे काम (काँक्रीट) मंजूर करण्यात आले असल्याचे पत्र कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांना या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग (सा.बां.) विभागाच्या मुख्य अभियंता यांनी दिले आहेत. सदर रस्त्याचे काम काँक्रीटीकरणातून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या कामाला लवकरच गती मिळणार आहे.

केंद्रीय रस्ते वहातूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची 7 जून 2022 रोजी आ. जयंत पाटील यांनी दिल्ली येथे भेट घेत याबाबतचे निवेदन त्यांना दिले होते. अलिबाग हे पर्यटन स्थळ असून ते मुंबईच्या जवळ आहे. यामुळे सध्याच्या काळात पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणात ये-जा ही होत असते. या पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहनांची कोंडी होऊन पर्यटकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे अलिबागच्या विकासाचा आणि पर्यटकांच्या होणाऱ्या त्रासाचा विचार करून अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी करावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली होती.

रस्त्यावर वाहनांची कोंडी
तसेच अलिबाग ते वडखळ हा रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावर वाहनाची कोंडी वाढत आहे. अलिबाग येथील वाढते आकर्षण लक्षात घेता. पर्यटकांच्या दृष्टीने अलिबाग ते वडखळ हा रस्ता दोन पदरी झाल्याने नागरिकांना वहातुकीच्या समस्यांना दिलासा मिळेल. आ. जयंत पाटील यांनी केंद्रीय रस्ते वहातूक आणि महामार्ग जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल घेत सदर रस्ता दुपदरी करण्याला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यातील जनतेसोबतच पर्यटकांना देखील दिलासा मिळणार आहे.

कोंडी टाळण्यासाठी खंडाळा येथे पुल उभारण्याचा विचार
अलिबाग खंडाळा मार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी खंडाळा येथे पुल उभारण्याचा विचार केला जात आहे. पुल उभारला गेला तर वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात निघेल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version