वडिलांच्या त्यागाचं आज चिज झालं
। मेलबर्न । वृत्तसंस्था ।
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी 21 वर्षांच्या नितीश कुमार रेड्डीने गाजवली आहे. या सामन्यात तिसर्या दिवसानंतरही जरी ऑस्ट्रेलिया आघाडीवर असले, तरी नितीशने त्याचे नाणे या सामन्यात खणखणीत वाजवले आहे. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत त्याने शतक ठोकले आहे. त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारीही केली. मात्र, त्याच्या शतकासोबतच त्याच्या वडिलांचीही चर्चा झाली. त्याचे वडीलही मेलबर्नमध्ये त्याने शतक केले, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित होते.
बॉक्सिंग डे कसोटीतील तिसर्या दिवशी भारताचे आघाडीचे फलंदाज माना टाकत असताना नितीश कुमार रेड्डीने कसोटी संघातील त्याची निवड सार्थ ठरवली आहे. तो दिवसाअखेर 176 चेंडूत 105 धावांवर नाबाद आहे. तत्पूवी, ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांचा पाठलाग करताना भारताने 7 फलंदाज 221 धावांवर गमावले होते आणि संघावर फॉलो आनचे संकट होते. मात्र, नितीश व वॉशिंग्टन सुंदर या जोडीने शतकी भागीदारी करून संघाचा फॉलोऑनच टाळला नाही, तर आता पहिल्या डावात आघाडी घेण्याचे स्वप्न चाहत्यांना दाखवले आहे. नितीश कुमार रेड्डी व वॉशिंग्टन सुंदर यांनी आतापर्यंत 107 धावांची भागीदारी केली आहे आणि मेलबर्न कसोटीत 8व्या किंवा त्या खालच्या क्रमावरील विकेट्ससाठीची ही चौथी सर्वोत्तम धावांची भागीदारी ठरली आहे. नितीशच्या शतकामुळे भारताने तिसर्या दिवस अखेर 116 षटकांत 9 बाद 358 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे 116 धावांची आघाडी आहे.
वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू
नितीश जेव्हा शतकाच्या जवळ होता, तेव्हा त्याचे वडील प्रार्थना करताना दिसत होते आणि त्याने शतक पूर्ण करताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कारण नितीशने इथपर्यंत पोहचण्यात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा आहे. विशाखापट्टणममध्ये त्याचे नोकरी करत होते. 2012 दरम्यान, त्यांची बदली राजस्थानला होणार होती. परंतु, नितीशच्या क्रिकेटसाठी त्यांनी ही बदली नाकारली आणि नोकरी सोडली आणि नितीशच्या क्रिकेटसाठी योगदान दिले. नितीश तिथे एमएसके प्रसाद यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेत होता. नितीशेनेही आई-वडिलांचे कष्ट पाहिले आणि क्रिकेटमध्ये प्रगती केली.
नितीश त्याच्या कहाणीबद्दल सांगतो की, सुरुवातील मी खूप गंभीर नव्हतो. परंतु, माझ्या वडिलांनी नोकरी सोडली. माझ्या कहाणीमागे खूप त्याग आहेत. एक दिवस मी वडिलांना आर्थिक अडचणीमुळे रडताना पाहिले आणि मग ठरवले की मी असे करून चालणार नाही, मला गंभीरतेने क्रिकेट खेळावे लागेल. मी माझी पहिली जर्सीही त्यांना दिली आहे आणि त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहिला आहे.
क्रिकेटमधील पदार्पण
नितीशने 2020 मध्ये आंध्र प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने 2021 मध्ये प्रथम श्रेणी आणि टी-20 क्रिकेटमध्येही पदार्पण केले. त्याचा खेळपाहून सनरायझर्स हैदराबादनेही त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला 2023 मध्ये संघात स्थान दिले. 2024 मध्ये नितीशने त्याच्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले. त्याला 2024 मध्ये लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पणाचीही संधी मिळाली. त्याने बांगलादेशविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये टी-20 सामन्यातून भारतासाठी पदार्पण केले. त्यानंतर त्याची निवड ऑस्ट्रेलिया दौर्यासाठीही झाली आणि पहिल्या सामन्यापासूनच नितीशने त्याची प्रतिभा दाखवली.