15 डिसेंबर होणार सुनावणी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रात बंदी घातलेल्या बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी करण्यात येणार होती, मात्र, आता याबाबतची पुढील सुनावणी 15 डिसेंबर रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी आणि बैलगाडा शर्यती पुन्हा राज्यात सुरू कराव्यात यासाठी बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीने हे प्रयत्न सुरू आहेत.
तमिळनाडूमधील जल्लिकट्टू या बैलांच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागांत बैलगाडा शर्यती होण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून त्याविषयीच्या नियमांचा मसूदा तयार केला आहे.
राज्यातील विविध भागांत दिवाळीदरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतींवरील बंदी पुढील काही आठवड्यांसाठी कायम ठेवली होती. त्यामुळे यंदाच्या दिवाळीदरम्यान राज्यात बैलगाडा शर्यती होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक बैगगाडा शर्यत प्रेमींचा हिरमोड झाला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने 2017 साली बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती. ही बंदी आतापर्यंत कायम आहे. आता राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, इतर राज्यांनाही उत्तर देण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे 15 डिसेंबर रोजी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय नेमकी काय भूमिका घेतय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बैलगाडी शर्यतीबाबत अद्याप निर्णय नाही
