रोहे तालुक्यातील वणव्यांची गुगल अर्थकडून दखल

| नागोठणे | वार्ताहर |
एखाद्या गोष्टीची दखल आतंरराष्ट्रीय माध्यमांनी घेणे ही बाब भूषणावह मानली जाते मात्र रोहे तालुक्यात वारंवार लागणार्‍या वणव्यांनी निसर्गाची जी अपरिमित हानी होत आहे त्याची दखल गुगलच्या उपग्रहीय प्रतिमेत कैद झाली असल्याने ही गोष्ट रायगड जिल्ह्यासाठी भूषणावह आहे की दुषणावह याचा विचार करण्याची वेळ आली आहे.


गुगल अर्थ वर रोहे तालुक्याचा नकाशा पाहिला असता अनेक डोंगरांवर धुरांचे प्रचंड वलय निर्माण झालेले दिसून येत आहे. प्रथमदर्शनी हे वलय पावसाळी ढगांसारखे वाटत असले तरी हे वणव्याच्या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचे असून याचे दुष्परिमाण वनसंपदा व पक्षी प्राण्यांनाच भोगावे लागणार नसून नागरिकांना ही या वणव्यांची झळ बसू शकते. फक्त रोहे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात हे वणवे प्रामुख्याने उन्हाळ्यात लागत असतात. यातील काही निसर्गनिर्मित असले तरी बरेचसे मानवनिर्मितही असतात. अवैध शिकार, लाकूडतोड अथवा वनजमिनींवर अनधिकृत कब्जा इत्यादी कारणे मानवनिर्मित वणव्यांना कारणीभूत ठरतात असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.

एकेकाळी घनदाट असलेले कोकणातील जंगल विरळ होत चालले असताना हे वणवे कोकणच्या वनसंपदेस शाप ठरत आहेत अशावेळी वनखात्याने व शासनाने तातडीची पावले उचलून या वणव्यांना आळा घालण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

सिद्धार्थ सोष्टे
Exit mobile version