अतिक्रमण ‘बांधकाम’ शब्दामुळे बांधकाम विभागावर रोष
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर शहरातील महामार्ग अंडरपास बॉक्स कटींग स्वरूपाचा होऊन वाहतूक सुरू झाली असताना या महामार्गावरील पूर्व आणि पश्चिमे कडील सर्व्हिसरोड जोडणारे पाच पूल सध्या विविध टपरीधारक, वाहनमालक तसेच प्रवासी रिक्षा चालकांसाठी वाहनतळ ठरू पाहात आहेत. यापैकी टपरीधारकांना राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उपविभागाच्या सहायक अभियंता महाडतर्फे नोटीसा जारी करण्यात येऊन अतिक्रमण बांधकाम न हटविल्यास कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये अतिक्रमण ’बांधकाम’ शब्दाच्या उल्लेखामुळे टपरीचालकांनी पोलादपूर शहरामध्ये महामार्गालगत कायमस्वरूपी बांधकाम करणार्यांकडे अंगुलीनिर्देश केल्यामुळे बांधकाम उपविभागाला कारवाई करण्याऐवजी दोन्ही प्रकारच्या अतिक्रमण करणार्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
पोलादपूर शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एस.टी. बसस्थानक परिसराच्या साधारणपणे 30 फूट जमिनीखालून गेल्यानंतर चौपदरीकरणाच्या काँक्रीट रस्त्याच्या महामार्गावरील भागात या महामार्गाचे पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व्हिसरोड तयार करण्यात आले. अंडरपास महामार्गावर रस्ता दुभाजक म्हणून रस्त्याच्या मधोमध काही गार्डस्टोन बसविण्यात आले आहेत. मात्र, पूर्वेकडील सर्व्हिस रोड आणि पश्चिमेकडील सर्व्हिस रोड यांना जोडण्यासाठी तब्बल पाच पूल बांधण्यात आले आहेत. सुरूवातीच्या नकाशामध्ये केवळ एकाच पुलासाठी मंजुरी असताना मागणीनुसार पूल बांधून देणार्या महामार्ग बांधकाम उपविभागाने ग्रामदैवत काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानकडे जाणार्या जोडरस्त्यासाठी पूर्वेकडील सर्व्हिसरोडकडून पश्चिमेकडील सर्व्हिसरोडकडे जोडणारा पूल न बांधल्याने रयत विद्यामंदिराकडे जाणार्या विद्यार्थ्यांना उत्तरेकडील बाजूच्या अंडरपास महामार्गावर पायपीट करून महामार्ग ओलांडावा लागत आहे. सध्याच्या पाच पुलांपैकी तीन पुलांवर टपर्या आणि खासगी वाहनांचा पागि झोन झाला असून, पोलादपूर एस.टी. स्थानकातून बाहेर येणार्या तसेच स्थानकात जाणार्या बसेसना अडथळा होत असल्याची तक्रार केली जात आहे, तर दुसरीकडे पश्चिमेच्या सर्व्हिसरोडवरून पूर्वेकडे एसटी स्थानकामध्ये एसटी बसेस आणताना पश्चिमेच्या गटारवजा फुटपाथवर तसेच पुर्वेच्या रस्त्यावरून पश्चिमेच्या सर्व्हिसरोडवर बसेस नेताना बसेसची मागील बाजू पुर्वेच्या गटारवजा फुटपाथवर अडल्याच्या घटनांचे सातत्य दिसून येत आहे.
मूळ मंजूर नकाशा व आराखड्यानुसार पोलादपूरच्या अंडरपास बॉक्स कटींगपध्दतीच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बाजूला केवळ एकच व्हेईक्युलर ब्रिज मंजूर असताना तब्बल चार व्हेईक्युलर ब्रिज अधिक बांधताना ते बांधकाम अतिक्रमण आहे अथवा कसे किंवा ती मंजुरी मागाहून देण्यात आली अथवा कसे, याबाबत कोणताही खुलासा राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता महाडतर्फे स्पष्टपणे करण्यात आला नसताना त्या व्हेईक्युलर ब्रिजवरील टपर्यांना बांधकाम शब्द वापरत अतिक्रमण असल्याने स्वत:हून तोडण्याच्या नोटीसा या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उपविभाग सहायक अभियंता श्रेणी 1च्या स्वाक्षरीने पाठविणार्या उपविभागाने राष्ट्रीय महामार्ग (जमीन व वाहतूक) नियंत्रण कायदा 2002 अन्वये राष्ट्रीय महामार्ग हद्दीत बांधकाम करून अतिक्रमण करणे हा दखलपात्र गुन्हा असून, नियंत्रण कायद्याचा भंग असल्याने सदरचे बांधकाम न हटविल्यास अतिक्रमण बांधकाम हटविणे कारवाई या विभागामार्फत करण्यात आल्यानंतर होणार्या नुकसानीची जबाबदारी टपरीधारक तसेच अतिक्रमण करणार्यांचीच राहील, असे या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, या अतिक्रमण बांधकामधारकांना नोटीशी बजावण्यात आल्यानंतर त्यांनी सर्व्हिसरोडलगत झालेल्या अतिक्रमण बांधकामांवर आधी कारवाई करा, असे आव्हानच राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उपविभाग सहायक अभियंता श्रेणी 1 यांना सोशल मिडीयामार्फत दिले आहे. या पाच व्हेईक्युलर ब्रिजेस पैकी एका पुलावर मिनीडोर प्रवासी वाहतूक थांबा असून चौकाराची संधी मिळाल्यास सदरचा मिनीडोर प्रवासी वाहतूक थांबा कोणीही हटविणार नाही, अशी ग्वाही सत्यनारायण महापुजेवेळी मिळाली असल्याने निर्धास्तपणा आला आहे, तर टपरीधारकांनीही लवकरच श्रीसत्यनारायणाची महापूजा घालून श्रीसत्यनारायण पावतो की कसे, हे अजमावण्याचा विचार सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.