ट्रेकर्सना सूचना! ‘या’ किल्ल्यावर दरडींचा धोका

| नेरळ| प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळजवळील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील ममदापूर वाडीमधील 15 कुटुंबं दरडीच्या छायेत असल्याने त्या सर्व कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 60 घरांची वस्ती असलेल्या या आदिवासी वाडीच्या मागे पेब किल्ल्याचा डोंगर आहे. दरम्यान, भला मोठा डोंगर असल्याने येते भूस्खलन झाल्यास थेट ही आदिवासीवाडी मातीखाली गाडली जाऊ शकते.

दरम्यान, ग्रामस्थांच्या सूचनेनंतर ममदापूर ग्रामपंचायत आणि नेरळ पोलीस ठाणे यांनी ममदापूरवाडीमध्ये बुधवारी ग्रामस्थांची बैठक घेतली. त्या आधी वनविभागाने या आदिवासी वाडीची पाहणी केली होती. कर्जत पंचायत समितीचे प्रशासक चंद्रकांत साबळे यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास अधिकारी मुकादम यांनी ममदापूरवाडीमध्ये जाऊन ग्रामस्थांना पावसाळ्यात असलेल्या संभाव्य धोक्याची माहिती दिली. त्यानंतर माजी सरपंच दामा निरगुडा, उप सरपंच कल्पना डांगरे, सदस्य भिका निरगुडे, जुबेर पालटे, माजी सदस्य राजू झूगरे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरू निरगुडे, दत्ता निरगुडे, दशरथ निरगुडे, जयवंत निरगुडे यांनी सर्व ग्रामस्थांची समजूत काढली. त्यावेळी पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे हेदेखील उपस्थित होते. त्यावेळी सुनील सोनवले, ज्ञानेश्वर शीनारे, अनिकेत गायकवाड, पुंडलिक शिनारे हेदेखील दरडी कोसळण्याच्या धोक्याची माहिती ग्रामस्थांना देत होते.

दरम्यान, परिस्थिती लक्षात घेऊन ममदापूरवाडीमधील 15 घरे तात्पुरते स्वरूपात रिकामी करण्याची सूचना सर्व ग्रामस्थांनी मान्य केली. त्यानुसार त्या सर्व डोंगराच्या लगत असलेल्या 15 कुटुंबाची राहण्याची व्यवस्था दिलकॅप महाविद्यालयात करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. त्यात तेथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असणार आहे. तर गावातील मंडळींनी गावातील मंदिरात रात्रीच्या वेळी मुक्काम करावा, असे निश्चित करण्यात आले आहे.

Exit mobile version