आता भाजपचे टार्गेट अजित पवार; ईडीसह प्राप्तीकर खात्याचे धाडसत्र

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच आता भाजपने टार्गेट केलेले आहे.अजित पवार संबंधित अनेक उद्योगांवर गुरुवारी ठिकठिकाणी प्राप्तीकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.त्यात कुटुंबियांच्या व्यवसायांवरही धाडी पडल्या आहेत.

अजित पवारांच्यासंबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. सातार्‍यातील जरंडेश्‍वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्‍वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्‍वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.

जरंडेश्‍वर कारखान्यावर धाडसत्र
सातार्‍यातील जरंडेश्‍वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्‍वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्‍वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू असून जरंडेश्‍वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती आहे.

बहिणीच्या ‘मुक्ता पब्लिकेशनवर’ छापा
दरम्यान अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. आयकरच्या चार अधिकार्‍यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले आहेत. तर विजया पाटील या पुईखडी इथल्या घरात उपस्थित आहेत.

पवारांच्या काठेवाडीत चौकशी
औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीसह पवारांच्या गाव असलेल्या काटेवाडी येथे केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात आली आहे. कंपनीवरती आयकर विभागाकडून तर काटेवाडी येथे ईडीच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. बारामतीमधील औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून कंपनीच्या कार्यालयाचा ताबा घेऊन अनेक कागदापत्रांची चौकशी करण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बारामती दौर्‍याच्या दुसर्‍याच दिवशी ही छापेमारी सुरू झाल्याने विविध तर्कवितर्क वर्तविले जात आहे.

माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याचं काही वाटत नाही. पण फक्त रक्ताचं नातं आहे म्हणून राजकारणाशी, कंपन्यांशी दुरान्वये संबंध नसलेल्या माझ्या बहिणींवर कारवाई केली जाते याचं वाईट वाटतं,


अजित पवार,उपमुख्यमंत्री

Exit mobile version