आता शिंदे गटाची बारी! मतभेद आले चव्हाट्यावर

आमदार आक्रमक; सत्ता सोडण्याचा दिला इशारा
। मुंबई । प्रतिनिधी ।
गेले काही दिवस ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. या काळात शिंदे गट चांगलाच फार्मात असल्याचे दिसून आले. सत्तेत आल्यानंतर शिंदे गट सरकार चालविणार असं काहीसं चित्र समोर आलं होतं. मात्र भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केल्याने शिंदे गटातील आमदारांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी याबाबत चांगलाच समाचार घेतला. यावरुन शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या टिकेवर प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले कि, सोमय्यांनी असं काही समजू नये की, आता शिवसेना संपली. ही तीच शिवसेना आहे व आम्ही भाजपा – शिवसेना युती म्हणून सत्तेत काम करतोय. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज करून घेऊ नये.
यापुढे सोमय्यांनी असे वक्तव्य करू नये. अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे मात्र भाजपा व शिंदे गटातील मतभेद आता चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे.

सोमय्यांचं ट्विट बंडखोर आमदारांच्या जिव्हारी
सोमय्या यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर सोमय्या यांनी एक ट्वीट केले. ज्यात त्यांनी शिंदे यांचं अभिनंदन करत म्हटलं आहे की, मफमंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांचं कौतुक केलं. ज्या सरकारमधील काही लोकांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता. ते सत्तेचा दुरुपयोग करत होते. ही एक प्रकारची माफियागिरी होती. मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. त्याचं कुटुंब हत्या करणार्‍याला माफियाच म्हणणार. या ट्विटमुळे बंडखोर आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले दिपक केसरकर?
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये. यावर आपली प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले आहेत की, अशा प्रकारची प्रतिक्रिया आपआपल्या पक्षाचे लोक देत असतात. यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. याबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, आम्ही जेव्हा मुंबईत आलो त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याह सर्व आमदार आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. ज्याला देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते. त्या बैठकीत मला बोलण्याची संधी मिळाल्यावर मी विनंती केली होती की, आमचे नेते उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही अन्य नेत्यांच्या बाबतीत वक्तव्य करण्यात येऊ नये. त्यांनी ती विनंती मान्य केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाजप कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून सांगितलं होतं की, जे ज्येष्ठ नेते असतात, त्यांच्याशी राजकीय वाद होऊ शकतो. परंतु कोणीही त्यांच्याबद्दल काहीही वक्तव्य करू नये. असे त्यांनी स्पष्ट सागितलं होतं. असं असताना सोमय्यांनी असे बोलणे आम्हाला पटलेलं नाही.

Exit mobile version