दोन महिन्यांचे वेतन न दिल्याने उपासमारीची वेळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी कर्मचारी आरोग्य विभागात काम करीत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतनच दिले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, ते आर्थिक संकटात सापडले आहेत. हा विभाग सलाईनवर असल्याचे बोलले जात आहे.
शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी पडत होते. शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविताना या कर्मचाऱ्यांना अडचण निर्माण झाली. त्यामुळे शासनाने कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला. एनआरएचएम अर्थात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणा अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य व उपकेंद्रामध्ये वेगवेगळ्या पदावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. 750 कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या शाखेत हे कर्मचारी काम करतात. शासनाच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केले जाते. परंतु, हेच कर्मचारी शासनाच्या उदासीनतेमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांचे जानेवारीपासून मानधनच दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. शासनाकडून निधी न आल्याचा फटका या कर्मचाऱ्यांना बसला आहे. महिन्यातील आर्थिक खर्चाचा ताळमेळ बिघडू लागला आहे. कर्ज काढलेल्या कर्मचाऱ्यांना बँकाचा हप्ता देतानाही अडचणी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.
मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे वेतनासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, असा सवाल कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
