| रसायनी | वार्ताहर |
प्रधानमंत्री निक्षय पोषण योजनेंतर्गत खालापूर तालुक्यातील क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत मध्ये येणारे क्षयरोग रुग्ण यांना कोरडा आहार (फूड बास्केट) याचे वाटप खालापूर तहसीलदार अभय शिवाजीराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
पूरक पोषण आहार रोगापासून व्यक्तीला दूर ठेवण्यास मदत करतो. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्षय रुग्णांसाठी निक्षय पोषण योजना आधार ठरत आहे. एप्रिल 2018 पासून ही योजना केंद्र सरकारने कार्यान्वित केली आहे. प्रामुख्याने संसर्गातून हा आजार होता. बहुतांश वेळा प्रतिकार शक्तीची कमतरतेमुळे प्रामुख्याने व्यक्ती या आजाराला बळी पडतो. थुंकीचे नमुने, एक्सरे काढल्यानंतर तपासणी अंती क्षयरोगाचे रुग्ण निदर्शनास येतात. खाणपानात झालेला बदल पाहता नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार बळावतो, असे डॉ. अनिलकुमार शहा यांनी सांगितले. त्यादृष्टीने अशा बाधीत रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार एक एप्रिल 2018 पासून उपचारावरील सर्व क्षय रुग्णांसाठी निक्षय पोषण आहार योजना अर्थात पोषण आहार भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नियमित उपचार घेणार्या क्षय रुग्णांना उपचार कालावधीत यात 500 रुपये दरमहा पोषण आहार भत्ता देण्यात येतो. आदिवासी भागा करीता हा भत्ता 750 रुपये असल्याची माहिती मिळते. पोषण युक्त आहार या रुग्णांना मिळावा व त्यांचे आरोग्य सुधारावे हा सकारात्मक दृष्टीकोण समोर ठेवून महानगर गॅस यांच्या सहकार्याने, डॉ.अनिलकुमार यांनी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन तहसीलदार अभय चव्हाण यांनी केले.
यावेळी खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते पोषण आहार वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस पाटिल संघटनेचे अध्यक्ष अनंत ठोंबरे पाटील, सूरज तडवी, महेंद्र पिंगळे, समाधान धनवे, हनुमंत गोवारी, स्वाती गावडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, रुग्ण उपस्थित होते.







