मतदार होण्यासाठी 19 ऑक्टोबर अंतिम मुदत

जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांची माहिती

। रायगड । खास प्रतिनिधी ।

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही. त्यांनी तातडीन 19 ऑक्टोबरपूर्वी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु असून मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या पात्र मतदारांची आतापर्यंत नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांनी तात्काळ नाव नोंदणी करावी. 19 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नागरिकांकडून प्राप्त अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येणार आहेत. या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आवर्जून बजावावा. तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन जावळे यांनी केले आहे.

Exit mobile version