| रसायनी | वार्ताहर |
जाई फाऊंडेशन संचालित शब्दवेल साहित्य मंचद्वारा आयोजित ‘एक दिवस कवितेसाठी’ हे कविसंमेलन के.गो. लिमये वाचनालय, पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शब्दवेलच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षा कवयित्री योगिनी वैदू, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रतिभा सराफ (ज्येष्ठ साहित्यिका), शिवाजी गावडे (ज्येष्ठ साहित्यिक) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दवेलचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर यांनी केले. काव्यसंमेलनास परीक्षक म्हणुन गझलकार कमलाकर राऊत, स्वाती गावडे व कविता राऊत यांनी काम पाहिले. एकूण 35 कवींमधून कवी रामबंधु खंडू अंढागळे, चेंबुर यांना प्रथम, कवयित्री अक्षदा गोसावी, नेरूळ यांना द्वितीय, तर कवी विशाल पवार, पनवेल हे तृतीय तर बालकवी समर नितीन मोतलिंग यास उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्दवेलचे केंद्रीय संघटन प्रमुख देवेंद्र इंगळकर व आभार शब्दवेलचे रायगड जिल्हाध्यक्ष विलास पुंडले यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रत्येक महिन्यात आयोजित केल्या जाणार्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त साहित्यिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले. अधिक माहितीसाठी 7720945002 (प्रवीण बोपूलकर) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.