कामोठ्यात स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी ।

कामोठे सेक्टर-10 येथील साई सिद्धी सोसायटीत बुधवारी (दि.1) पहाटे घडलेल्या भीषण दुर्घटनेत बेडरूमचा स्लॅब कोसळून 39 वर्षीय सुरेश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची 12 वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, इमारतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साई सिद्धी सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 101मध्ये सुरेश लोखंडे कुटुंबासह वास्तव्यास होते. बुधवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी वेदिका बेडरूममध्ये झोपलेले असताना अचानक छतावरील स्लॅबचा काही भाग कोसळला. स्लॅबचा मोठा भाग सुरेश लोखंडे यांच्या छातीवर व शरीरावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही भाग मुलीच्या अंगावर पडल्याने ती जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील रहिवाशांनी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सुरेश लोखंडे यांना मृत घोषित केले. जखमी वेदिका लोखंडे हिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि नवी मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर जुन्या इमारतींच्या संरचनात्मक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version