मे अखेरपर्यंत मूर्तींची होणार रवानगी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पेणच्या सुबक,देखण्या गणेशमूर्तींची केवळ महाराष्ट्रीयन जनतेलाच भूरळ पडलीय असे नाही तर विदेशातही नोकरी,व्यवसायानिमित्त अनेक वर्षे वास्तव्य करुन असलेल्या मराठी माणसाच्या घरी गणेशोत्सवात पेणच्या बाप्पांचीच प्रतिष्ठापना केली जाते.त्यास अनुसरुन यावर्षीही मे अखेरपर्यंत किमान 1 लाख गणेशमूर्ती विदेशात पाठविल्या जाणार आहेत.त्याची लगबग सध्या गणेशमुर्ती कारखान्यांमध्ये सुरु आहे.
गणेशोत्सवाचे आगमन 19 सप्टेंबरला घरोघरी होणार आहे. आकाराने रेखीव असलेल्या या गणेशमुर्तींना विदेशात मागणी वाढली आहे. अमेरिका, न्युझीलंड, इंग्लड , थायलंड आदी देशांमध्ये आतापर्यंत तीस हजार गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या असून मे अखेरपर्यंत एक लाख गणेशमूर्ती विदेशात पाठविण्यात येणार असल्याची माहिती गणेशमू र्तीकारांनी दिली.
पेण शहराबरोबरच तालुक्यातील हमरापूर, जोहे, दादर, रावे, अंतोरे, तरणखोप, बोरगाव, गणपती वाडी, आंबेगाव, वाशी, वढाव, शिर्की, कोप्रोली, वडगाव आदी गावे या व्यवसायावर अवलंबून आहेत. वाढत्या कारखानदारीतून कारागिर, हमाल, टेम्पोवाले आदींना यातून रोजगार प्राप्त होतो. एक लाखाहून अधिक कामगारांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो.
आतापर्यंत 30 मूर्ती पोहोचल्या
गणरायाचे आगमन 19 सप्टेंबरपासून होणार आहे. पावसाळ्यापुर्वी विदेशात गणेशमूर्ती पाठविण्यासाठी पेणमध्ये मूर्ती तयार करण्यापासून विदेशात पाठविण्याची लगबग जोरात सुरु आहे. फेब्रुवारीपासून विदेशात मूर्ती पाठविण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका, थायलंड ऑस्ट्रेलिया, इंग्लड अशा अनेक देशांमध्ये पेणमधील गणेशमुर्तीना मागणी वाढली आहे. विदेशात गणेशमूर्ती पाठविण्याची लगबग सुरु झाल्याने कारागीर व इतर कामगार मग्न असल्याचे दिसून येत आहे.
विदेशात गणेशमुर्ती पाठविण्याची लगबग गेल्या फेब्रुवारी महिन्यांपासून सुरु आहे. विदेशात एक लाख गणेशमूर्तींना मागणी आहे. आतापर्यंत तीस हजार मूर्ती विदेशात पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित मूर्ती मे अखेरपर्यत पाठविण्यात येणार आहेत.
सचिन समेळ – व्यवसायिक